उध्दव ठाकरेंचे कोकण पर्यटन अन नवसफेड!
By Admin | Updated: November 23, 2014 00:46 IST2014-11-23T00:46:14+5:302014-11-23T00:46:27+5:30
आभाराचा दौरा : कोकण विकासाच्या भावी प्रकल्पांची उजळणीही सुरू

उध्दव ठाकरेंचे कोकण पर्यटन अन नवसफेड!
रत्नागिरी : शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांचा आजपासून सुरू झालेला कोकण दौरा हा खऱ्या अर्थाने पर्यटन व नवसफेड दौरा असल्याचे स्पष्ट झाले. ठाकरे यांच्या चेहऱ्यावर निवडणुकीतील विजयाचे तेज झळाळत होतेच परंतु त्यांच्या मूडही चांगला असल्याचे अनेकांना जाणवले. ज्या कोकणवासियांनी शिवसेनेला निवडणुकीत भरभरून यश दिले त्यांच्या विकासासाठी काय करता येईल, याची उजळणी करणाराच हा दौरा असल्याची चर्चाही सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच ठाकरे कोकण दौऱ्यावर आले आहेत. गणपतीपुळे येथे त्यांनी गणेशदर्शन घेतले तसेच रत्नागिरीतील विजयासाठी उदय सामंत यांनी गणपतीकडे केलेल्या नारळांच्या नवसाची फेडही ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग अशा या दोन दिवसांच्या दौऱ्यात अनेक महत्वाच्या मंदिरांना ते भेट देणार असून त्यांच्याकडून त्या त्या मंदिरांमध्ये केलेल्या नवसांची फेड केली जाणार असल्याचे एकूण चित्र आहे. सिंंधुदुर्गातील चप्पल नवसफेडही या दौऱ्यात केला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
आपला हा दौरा जनतेचे आभार मानण्यासाठीच आहे, राजकीय दौरा नाही, असे ठाकरे यांनी वारंवार स्पष्ट केले. मात्र निवडणुकीत युती तुटल्याने झालेली धावपळ, झालेला त्रास, दगदग व अजूनही भाजपबरोबर राज्याच्या सत्तेत सहभागाबाबतची अनिश्चितता या पार्श्वभूमीवर ‘रिलॅक्स’ होण्याचा या कोकण दौऱ्यामागे प्रयत्न असावा, हेच स्पष्ट झाले आहे. पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांची उत्तरे देणे त्यांनी टाळलेच तरीही आलेल्या प्रश्नांना मोजक्या शब्दात उत्तर देत बगल दिली.
रत्नागिरी दौऱ्यातील त्यांची देहबोली पाहता या दौऱ्यात त्यांना कोकण पर्यटनाचा कुटुंबियांसह आस्वाद घेताना, नवस फेडतानाच कोकणवासियांना भविष्यात प्रकल्पाच्या रुपाने काही देता येईल काय, याची अप्रत्यक्षपणे चाचपणीच ठाकरे करीत असल्याचे पक्षातील काही नेत्यांचेही मत आहे. त्यामुळे या दौऱ्यानंतरच्या ठाकरे यांच्या भूमिकेकडे कोकणवासियांचे नक्कीच लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)