विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण
By Admin | Updated: January 29, 2015 00:09 IST2015-01-28T22:17:28+5:302015-01-29T00:09:59+5:30
शेखर गोवेकर आक्रमक : बांदा शहरातील विकासकामांकडे लक्ष वेधले

विविध मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण
बांदा : बांदा शहरातील विविध सामाजिक मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी बांदेश्वर मंदिर चौकात सामाजिक कार्यकर्ते शेखर गोवेकर यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी उशिरा व्यापारी संदेश पावसकर यांनी सरबत दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.बांदा येथील श्री देव बांदेश्वर देवस्थान ट्रस्टची निर्मिती करावी, बांदा तेरेखोल नदिपात्रावर फुटब्रिज बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, बांदा शहरातील पाणीपुरवठा टाकी व पाईपलाईन बाबत ग्रामपंचायतीने आराखडा तयार करणे, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुसज्ज व्हावी यासाठी इमारतीचा आराखडा मिळणेबाबत, कोकणात येणाऱ्या एस. टी. बसेस पूर्ववत सोडण्याबाबत, बांदा शहरातून जाणाऱ्या तिलारी उपकालव्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे, अशा अनेक मागण्यांचे निवेदन शेखर गोवेकर यांनी संबंधित विभागांना दिले आहे.मात्र, याची दखल घेण्यात न आल्याने गोवेकर यांनी बांदेश्वर मंदिर चौकात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी त्यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. सायंकाळी उशीरा संदेश पावसकर यांच्या हस्ते सरबत घेऊन गोवेकर यांनी आपले उपोषण मागे घेतले. (प्रतिनिधी)
चौपदरीकरणाच्या समस्येबाबत उपोषण
झाराप-पत्रादेवी चौपदरी महामार्गाच्या समस्यांबाबत येथील महेश तांडेल व संदेश भोगले यांनी प्रजासत्ताकदिनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. मात्र बांधकाम खात्याकडून या उपोषणाची दखल न घेतल्याने सायंकाळी उशीरा उपोषण मागे घेतले.