रेल्वे रुळाच्या चाव्या सरकण्याचे प्रकार
By Admin | Updated: January 23, 2015 00:35 IST2015-01-22T23:37:47+5:302015-01-23T00:35:49+5:30
वेरवलीतील घटना : पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे प्रकार उघडकीस

रेल्वे रुळाच्या चाव्या सरकण्याचे प्रकार
लांजा : कोकण रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे खापर अज्ञात चोरट्यांच्या माथी फोडून हात वर करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने जीर्ण झालेल्या रुळाच्या चाव्या वीस वर्षांत न बदलल्याने तालुक्यातील वेरवली येथे रेल्वे गेल्यानंतर या आपणहून बाहेर पडत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. योग्य ती खबरदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना लांजा पोलिसांनी दिल्या आहेत. वेरवली येथील चॅनल क्र. २४५/७ येथील रुळाच्या चाव्या चोरीस जाण्याचा प्रकार ५ जानेवारी रोजी घडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लांजा पोलिसांनी अज्ञातविरुध्द गुन्हादेखील दाखल केला होता. त्यानंतर १७ दिवसांनी चाव्या गायब झाल्याची खबर मिळताच लांजाचे पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, बंड्या मसूरकर, ललित देऊस्कर, विजय कुवेस्कर, संजय उकार्डे यांचे पथक वेरवली येथे दाखल झाले. चाव्या गायब असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असताना याच मार्गावरून धडधडत रेल्वे आली. रेल्वे येताच रुळाला असणाऱ्या ३० ते ४० चाव्या आपणहून रुळावरुन उकटून बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. चाव्या न बदलल्याने व या ठिकाणी खोलगट भाग असल्याने येथील चाव्या रेल्वे गेल्यानंतर रुळावरुन पडत असल्याचे समजते. प्रशासन चाव्या चोरी होत असल्याची बोंब ठोकत असतानाच आपल्या भोंगळ कारभाराचे खापर चोरांच्या माथी फोडण्याचा हा केविलवाणा प्रकार रेल्वे प्रशासन करीत असल्याचे उघड झाले आहे. पडलेल्या चाव्या भंगारवाले जमा करुन विक्री करीत असणार, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, प्रशासन येथील रुळांना चाव्या बदलून रेल्वे मार्ग सुरक्षित करण्यास दिरंगाई का करीत आहे? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)