चांदोशीतील खूनप्रकरणी दोन महिलांसह चौघे अटकेत
By Admin | Updated: March 1, 2015 23:15 IST2015-03-01T22:47:19+5:302015-03-01T23:15:58+5:30
चारही संशयितांना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे

चांदोशीतील खूनप्रकरणी दोन महिलांसह चौघे अटकेत
पुरळ : चार दिवसांपूर्वी चांदोशी येथील खूनप्रकरणी दोन महिलांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. खून झालेल्या रामू आत्माराम निकम (वय ३५) याच्या मारेकऱ्यांना चार दिवसांनंतर देवगड पोलिसांनी पकडले असून, संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. रामू निकम याच्या खुनाने देवगड तालुका हादरला होता. त्याच्या पत्नीला जबरदस्तीने घेऊन जात असताना त्याने व त्याच्या वडिलांनी विरोध केला म्हणून त्याच्याच नात्यातील सुनील बाबल्या निकम, त्याची पत्नी शेवंती, दीपक निकम व त्याची पत्नी निर्मला (सर्व रा. खुडी) यांनी २६ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास चांदोशीतील शरद पुरुषोत्तम कुबडे यांच्या बागेत ते झोपलेल्या ठिकाणी येऊन दांड्याने मारहाण केली. यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन निकम याचा जागीच मृत्यू झाला होता.देवगड पोलिसांनी त्यानंतर मारेकऱ्यांचा चार दिवस शोध घेतला. पोलिसांनी शनिवारी सायंकाळी किंजवडे डोबवाडी येथील जंगलात खून प्रकरणातील प्रमुख सूत्रधार सुनील बाबल्या निकम (३७) याला अटक केली.त्याला पोलिसी हिसका दाखविताच खून प्रकरणातील सहभागी असलेल्यांची नावेही त्याने सांगितली. सुरेखा ऊर्फ शेवंती सुनील निकम (३४) व निर्मला दीपक निकम (३३) या दोन्ही महिलांना रविवारी सकाळी साडेसात वाजता किंजवडे डोबवाडी येथे ताब्यात घेतले. खून प्रकरणातील चौथा संशयित दीपक वसंत निकम (३०) याला खुडी दाभलवाडी येथे सुनील बाबूराव निकम याच्या राहत्या घरानजीक असलेल्या जंगलमय भागात रविवारी सकाळी साडेअकरा वाजता ताब्यात घेतले. चारही संशयितांना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)