दुचाकी चोरणारा होमगार्ड ताब्यात
By Admin | Updated: March 24, 2015 00:17 IST2015-03-23T23:01:42+5:302015-03-24T00:17:29+5:30
मालवण पोलिसांना यश : बसस्थानकावरील चोरी प्रकरण

दुचाकी चोरणारा होमगार्ड ताब्यात
मालवण : तीन महिन्यांपूर्वी मालवण बसस्थानकावर उभी करून ठेवलेली दुचाकी चोरीप्रकरणाचा शोध लावण्यात मालवण पोलिसांना यश आले असून या प्रकरणी पोलिसांनी संतोष हिंदळेकर या मालवणातील होमगार्डला सोमवारी ताब्यात घेतले आहे.
मालवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण सर्जेकोट येथील संध्या दशरथ जामसंडेकर या कुडाळच्या ग्रामीण रुग्णालयात नोकरीस असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी आपल्या मालकीची प्लेजर दुचाकी (एम. एच. ०७, आर-८६२३) ही मालवण बसस्थानकावर उभी करून त्या कुडाळ येथे कामास गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी त्या मालवण बसस्थानकावर आल्या असता त्यांना उभ्या करून ठेवलेल्या जागी दुचाकी दिसली नाही. म्हणून त्यांनी शोधाशोध केली. मात्र ती न मिळाल्याने त्यांनी मालवण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. या तपासात मालवणातील होमगार्ड संतोष हिंदळेकर याला पोलीस स्थानकात बोलविण्यात आले. त्याचप्रमाणे तक्रारदार संध्या जामसंडेकर यांनाही बोलविण्यात आले. संबंधित संतोष हिंदळेकर याने आपल्याला ही दुचाकी आपल्या मानलेल्या बहिणीच्या नवऱ्याने दिली आहे, असे मालवण पोलिसांना सांगितल्याचे समजते. मालवण ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल कोकणी हे याबाबत अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
दुचाकीला बनावट नंबरप्लेट लावली
मालवणातील दुचारी चोरी प्रकरणी होमगार्ड संतोष हिंदळेकर याच्या ताब्यातील दुचाकीची तपासणी केली असता ती जामसंडेकर यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. या दुचाकीचा मूळ नंबर बदलून त्याठिकाणी दुसरी बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी संतोष हिंदळेकर याला ताब्यात घेतले.