आणखी दोघा संशयितांना कोठडी
By Admin | Updated: July 30, 2014 22:58 IST2014-07-30T22:53:53+5:302014-07-30T22:58:33+5:30
मुलीला फूस लावून पळविले प्रकरण

आणखी दोघा संशयितांना कोठडी
कुडाळ : कुडाळ येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी रोहित फाले याला मदत करणाऱ्या आणखी दोघा संशयितांना कुडाळ पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील पाचही संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुडाळ येथील अल्पवयीन मुलीला पळविल्याच्या तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रोहित फाले याला गोव्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीवेळी आणखी काहीजण या प्रकरणात सामील असल्याचे पोलिसांना समजल्याने त्यानंतर संतोष तारी व देवेंद्र माने यांनाही पोलिसांनी बांदा येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर मंगळवारी याप्रकरणातील बांदा येथील रहिवासी तुकाराम उर्फ भूषण महादेव पाटील (२३) व अमित अनंत सावंत यांना कुडाळ पोलिसांनी सावंतवाडी येथून ताब्यात घेत त्यांच्याकडील कार व दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली. रोहित फाले याने अल्पवयीन मुलीला पळवून नेण्यासाठी मदत घेतलेल्या चारहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी ताब्यात घेतलेल्या तुकाराम पाटील, अमित सावंत यांना कुडाळ न्यायालयात आज बुधवारी हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)