पोस्टातील अपहारप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित
By Admin | Updated: November 20, 2015 00:13 IST2015-11-19T22:22:19+5:302015-11-20T00:13:03+5:30
. दरम्यान, पोस्टाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा सर्व खातेदारांकडून करण्यात येत आहे

पोस्टातील अपहारप्रकरणी दोन कर्मचारी निलंबित
साटेली-भेडशी : कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात झालेल्या अपहारप्रकरणी येथील पोस्ट मास्तर मानसी एन. गंगावणे व क्लार्क भगवान ए. अडाणे या दोघांना ओरोस येथील डाकघर अधीक्षक जे. टी. भोसले यांनी कामावरून निलंबित केले आहे. ही माहिती सावंतवाडी सहाय्यक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी दिली. कोनाळकट्टा पोस्टात हजारो खातेदार असून अनेक खातेदारांच्या खात्यातील रकमा परस्पर काढण्यात आल्या आहेत. ५ नोव्हेंबर रोजी के. पी. मुसा हे ठेकेदार आपली रक्कम काढण्यासाठी पोस्टात गेले असता आपल्या खात्यावर पैसे नसल्याचे त्यांना समजताच हा प्रकार खऱ्या अर्थाने उघडकीस आला. त्याच दरम्यान पोस्टात कार्यरत असलेला पत्रवाटप करणारा सुरेश बांदेकर अचानक गायब झाल्याने ठेवीदारांनी आपापली खाती तपासण्यासाठी मोठी गर्दी केली. त्यातून प्रत्येक खातेदाराच्या खात्यातील पैसे गायब झाल्याचे निदर्शनास येत होते. यावेळी उपस्थित अधिकारी भोसले व इंगळे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. यावेळी भोसले यांनी एक महिन्याची लेखी मुदत देत खातेदारांना शांत केले होते. सद्या विशेष समितीमार्फत सर्व खात्यांची तपासणी सुरू असून ही माहिती गोपनीय ठेवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पोस्टमास्तर म्हणून कार्यरत असलेल्या मानसी गंगावणे व क्लार्क भगवान अडाणे हे दोषी आढळल्याने त्यांना १७ नोव्हेंबरपासून निलंबित केले आहे. पत्र वाटप करणारा सुरेश बांदेकर याला काऊंटरवर बसवणे, सुपरव्हिजनमध्ये चुका करणे, कामात हलगर्जीपणा या चुका दोघांत आढळल्याने दोघांवर निलंबनाची कारवाई अधीक्षक भोसले यांनी केली असल्याचे उपअधीक्षक इंगळे यांनी सांगितले. खातेदारांनी आपली पासबुके शक्य तेवढ्या लवकर पोस्टात येऊन तपासणीसाठी जमा करावीत अथवा स्वत: तपासून घेऊन जाण्याचे आवाहन पोस्टातर्फे करण्यात आलेले आहे. त्यासाठी पोस्टाने अनेक ठिकाणी या संबंधीचे फलकही लावलेले आहेत. जोपर्यंत १०० टक्के पासबुके तपासणीसाठी पोस्टात येणार नाहीत. तापर्यंत त्या खातेदारांबद्दलची संपूर्ण माहिती किंवा अपहार आणि कोणत्या खातेदारांच्या बाबतीत झालेला आहे, हे सांगणे कठीण असल्याचे इंगळे म्हणाले. दरम्यान, पोस्टाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला आमचे पैसे मिळाले पाहिजेत, अशी अपेक्षा सर्व खातेदारांकडून करण्यात येत आहे. (वार्ताहर)
लवकरच सर्व उजेडात ---वरिष्ष्ठांच्या सांगण्यावरून काही माहिती आम्हाला गुपीत ठेवावी लागत असल्याने सर्व काही आत्ताच सांगणे आम्हाला शक्य नाही. सर्व खात्याची चौकशी सुरू असून अपहाराचा नेमका आकडा आजच सांगणे शक्य नाही. मात्र लवकरच अपहाराचा एकूण आकडा आणि यात दोषी असणाऱ्यांची माहितीही मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यातून लवकरच सर्व काही उजेडात येईल.
- अर्जुन इंगळे, सहाय्यक अधीक्षक