दोन दिवसांत ३00 अर्ज दाखल
By Admin | Updated: April 8, 2015 23:58 IST2015-04-08T23:01:23+5:302015-04-08T23:58:17+5:30
जात पडताळणी : रत्नागिरीतील अधिकारी सिंधुदुर्गनगरीत

दोन दिवसांत ३00 अर्ज दाखल
सिंधुदुर्गनगरी : निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या सोयीसाठी रत्नागिरी येथील जात पडताळणी समितीचे अधिकारी गेले दोन दिवस सिंधुदुर्गनगरी येथे दाखल झाले होते. गेल्या दोन दिवसांत सुमारे ३०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज सादर केले. जात पडताळणी समितीचे कार्यालय रत्नागिरी येथे आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना निवडणुकीसाठी आवश्यक असलेले जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रत्नागिरी येथे जावे लागते.
रत्नागिरी येथे जाण्यासाठी लागणारा विलंब, त्रास आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी नामनिर्देशनपत्र भरण्याची अंतिम तारीख ७ एप्रिल असल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी ६ व ७ एप्रिल रोजी विभागीय जात पडताळणी रत्नागिरी येथील सक्षम अधिकारी जात पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिले होते.
पहिल्या दिवशी ६ एप्रिल रोजी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी करत सुमारे २४० जणांनी आपले जात पडताळणी प्रस्ताव सादर केले तर मंगळवारी शेवटच्या दिवशी ५० ते ६० जणांनी प्रस्ताव सादर केले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. (प्रतिनिधी)
१0 एप्रिलला नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम मुदत
सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून ७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ७८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी मंगळवारपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. १० एप्रिलला प्राप्त अर्जाची छाननी होऊन नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर निवडणुकीतील प्रत्यक्ष उमेदवार निश्चित होतील. त्यानंतर निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांच्या जात पडताळणी अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.