वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना
By Admin | Updated: July 21, 2014 23:20 IST2014-07-21T23:17:57+5:302014-07-21T23:20:33+5:30
५० टक्क्यांचीच विक्री : उशिरा पेरणीने उत्पादन घटणार

वीस हजार क्विंटल बियाणे पेरणीविना
नितीन काळेल - सातारा
पावसाने दडी मारणे व त्याच्या उशिरा दाखल होण्याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. त्याचबरोबर बियाण्यांवरही झालेला आहे. खरीप हंगामासाठी उपलब्ध केलेल्यांपैकी ५० टक्के बियाणे विक्री न झाल्याने पडून आहेत. त्यामुळे सुमारे वीस हजार क्विंटल बियाण्यांना यंदा अंकुर फुटणार का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच उशिरा पेरणी झाली तर उत्पादन घटणार आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामासाठी सर्व प्रकारचे मिळून ५१ हजार ७३० क्विंटल बियाणे लागणार होते. त्यामध्ये भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आदी बियाण्यांचा समावेश आहे. त्याप्रकारे कृषी विभागाने नियोजनही केले होते. नियोजनाच्या तुलनेत जिल्ह्यात सुमारे ४० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. त्यापैकी १९ हजार ४३७ क्विंटल बियाण्यांचीच विक्री झालेली आहे. म्हणजे, उपलब्ध झालेल्या बियाण्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक बियाणे हे कृषी सेवा केंद्रात पडून आहेत. आता तर दुष्काळी भागात पाऊस नसल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राहिलेले बियाणे विक्रीला जाणारच नाहीत. फक्त पश्चिम भागातच बियाण्यांना मागणी राहणार आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील कृषी केंद्र चालकांना शिल्लक राहणाऱ्या बियाण्यांचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.
एकंदरीत पावसाने दडी मारल्याने पूर्वेकडील भागात दुष्काळाचे सावट तीव्र होताना दिसत आहे. पश्चिम भागात उशिरा पेरणी सुरू झाली असली तरी येथील लोकांना धान्य पदरी पडण्याची आशा आहे. पावसाळ्याचे दोन महिने संपत आले. त्यातच या महिन्याअखेरपर्यंत चांगला पाऊस पडला तरच दुष्काळी भागात पेरण्या होणार आहेत. पाऊस नाही झाला तर खरीप हंगाम वाया जाणार आहे. पाऊस होऊन उशिरा पेरण्या झाल्या तर उत्पादनात घट होणार आहे. (उत्तरार्ध)