टक्के मतदानासाठी प्रयत्न
By Admin | Updated: September 13, 2014 23:26 IST2014-09-13T23:26:27+5:302014-09-13T23:26:27+5:30
संतोष भिसे : आचारसंहितेचे काटेकोर पालन

टक्के मतदानासाठी प्रयत्न
कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महसूल यंत्रणेने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी चोख नियोजन केले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभा मतदारसंघातून सुमारे ७० टक्के मतदान झाले होते. ते वाढवून ८० टक्क्यांवर होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी सांगितले.
कणकवली विधानसभा मतदारसंघात २.२२ लाख मतदारांची आतापर्यंत नोंदणी झाली आहे. कणकवली व देवगडमध्ये प्रत्येकी १३६ तर वैभववाडीत ५७ मतदान केंद्रे आहेत. मतदारसंघासाठी ३९ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यांमध्ये प्रत्येक एक फ्लार्इंग स्क्वॉड २४ तास गस्त घालणार आहे. त्याचबरोबर तिन्ही तालुक्यांतील पोलीस तपासणी नाक्यांवर निवडणूक यंत्रणेचे स्थिर सर्वेक्षण पथक ठेवण्यात येणार आहे. या पथकासोबत कॅमेरा असून वाहन तपासणी केली जाईल. देवगडमध्ये चार, कणकवलीत तीन तर वैभववाडीत दोन स्थिर तपासणी पथके असतील.
व्हिडिओ सर्वेक्षण पथक मतदारसंघात होणाऱ्या राजकीय सभा, मेळावे यांचे मुद्रण करतील. व्हिडिओ सर्वेक्षण पथक या मुद्रीत सभा, मेळाव्यांची रोज पाहणी करतील. निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खर्च नियंत्रण पथक नेमण्यात आले आहे.
विधानसभेसाठी एक केंद्रीय निरीक्षक तसेच खर्चासाठी एक निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक आणि मतदार जागृतीसाठीही एक निरीक्षक नेमण्यात येणार आहे. वाहनांमधून प्रसारीत करण्यात येणाऱ्या ध्वनिमुद्रीत संदेशातून मतदानाविषयी जागृती करण्यात येणार आहे.
त्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्र जागृतीसाठीही शिबिरे आयोजित करण्यात येतील. मतदारसंघातील बूथ लेव्हल आॅफिसरची नेमणूक पूर्ण झाली आहे.
निवडणुकीत कार्यकर्ते अथवा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींकडून हॉटेल, लॉजचा वापर केला जातो. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही हॉटेल, लॉज मालकांना ग्राहकांची ओळखपत्र आदी माहिती घेऊन खात्री करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यासाठी सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या कालावधीत पैशांच्या वापरावरही निवडणूक यंत्रणा काटेकोर लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी बॅँक व्यवस्थापकांची बैठक घेऊन संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तसेच निवडणूक कालावधीत दारूसाठा आणि वाहतुकीवर कडक निर्बंध आणण्यासाठी उत्पादन शुल्क विभागालाही सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रांताधिकारी संतोष भिसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आवश्यक त्या ठिकाणी वेब कॅमेरे
मतदारसंघातील ३२९ मतदान केंद्रांपैकी कोणते केंद्र संवेदनशील आहे याची चाचपणी करून तेथे मायक्रो आॅब्झर्वर नेमण्यात येईल. तसेच वेब कॅमेरा केंद्रावर जोडून मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल. लोकसभा निवडणुकीत आठ ठिकाणी वेब कॅमेरे लावण्यात आले होते.
सोशल मीडिया सेल
निवडणुकीच्या प्रचारासाठी आता सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. या माध्यमातून प्रचार करताना आचारसंहितेचा भंग होऊ शकतो. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘सोशल मीडिया सेल’ तयार करण्यात आला आहे.