सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: July 18, 2014 22:55 IST2014-07-18T22:54:08+5:302014-07-18T22:55:07+5:30
वैभव नाईक : नारायण राणेंवर केले थेट आरोप

सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न
मालवण : उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुकारलेले बंड आणि मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घेतलेली भूमिका हा त्यांचा जनतेची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केली आहे. राणेंच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेबद्दलही आपले मत व्यक्त करताना राणेंना घेऊन निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही पक्षास आमचा विरोध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राणेंचे बंड आणि त्यानंतर घडणाऱ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी शुक्रवारी मालवण दौरा केला. यावेळी त्यांनी जिल्हा शिवसेनेच्यावतीने आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. दरम्यान, तालुका शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. सुरूवातीला त्यांनी मालवणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे अभिनंदनही केले.
शिवसेनेत नाराज असलेले राणे काँग्रेसमध्ये गेले. आज ते काँग्रेसमध्ये नाराज आहेत. राणेंची नाराजी नेमकी कोणत्या कारणासाठी आहे हेसुद्धा त्यांनी जनतेसमोर स्पष्ट करावे, असे वैभव नाईक म्हणाले. काँग्रेसमध्ये त्यांनी उद्योगमंत्रीपद भोगले. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही ते काम पाहतात. मंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्याचे कोणतेही उद्योग धोरण जाहीर केले नाही किंवा जिल्ह्यात कोणतेही उद्योग आणले नाहीत. लगतच्या कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गचा विकास आराखडा लहान आहे. पालकमंत्री राहिलेल्या नारायण राणेंना शेजारी जिल्ह्यांच्या तुलनेत येथील विकास आराखडा वाढवता आला नाही, असेही वैभव नाईक म्हणाले. (प्रतिनिधी)