डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्नशील

By Admin | Updated: October 29, 2014 00:15 IST2014-10-28T22:47:58+5:302014-10-29T00:15:54+5:30

नीतेश राणे : कणकवली उपजिल्हा रूग्णालयाला भेट, जाणून घेतल्या समस्या

Trying to fill the vacancy of the doctor | डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्नशील

डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्नशील

कणकवली : जनतेला अद्ययावत आरोग्य सुविधा मिळण्यासाठी कणकवलीसह जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या रिक्त जागा तत्काळ भरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. राज्य शासनाने अकरा महिन्यांची सेवानियुक्ती डॉक्टरांना देऊन रिक्त पदे भरावीत अशी आग्रही मागणी शासनाकडे करणार असल्याचे आमदार नीतेश राणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करताना सांगितले.
कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आमदार राणे यांनी तेथील आरोग्य सुविधांबाबत तसेच समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी डॉ. श्रीधर जाधव यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते.
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. यामध्ये सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे ही वर्ग २ ची आहेत. यामध्ये नेत्रतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, एम.डी.मेडिसिन व अपघात विभागासाठी लागणारे तीन डॉक्टर अशा पदांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी यायला इच्छुक नसल्याचे यावेळी उपस्थित डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य मंत्रालयाकडून यापूर्वी ११ महिन्यांची नियुक्ती डॉक्टरांना दिली जात होती. मात्र, अशा नियुक्त्या बंद केल्याने तसेच वर्ष दोन वर्षाने इच्छित स्थळी बदली मिळण्याची आशा नसल्याने नियुक्ती होऊनही सिंधुदुर्गात डॉक्टर यायला इच्छुक नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे नवनियुक्त मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून ११ महिन्यांची नियुक्ती डॉक्टरांना सिंधुदुर्गात मिळेल अशा प्रकारचा निर्णय घेण्यासाठी विनंती करण्यात येईल असे आमदार नीतेश राणे यांनी यावेळी सांगितले.
माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून ट्रामा केअर सेंटरसाठी ५० लाखांचा तर अत्याधुनिक शवविच्छेदन केंद्रासाठी २२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. तसेच तळेरे येथे ट्रामा केअर सेंटर उभारण्यासाठीही निधी प्राप्त झाला होता. त्या कामांचा आढावा नीतेश राणे यांनी यावेळी घेतला.
उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यासाठी ४ कोटी ५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून तसा प्रस्ताव शासनाजवळ पाठविण्याची सूचनाही नीतेश राणे यांनी यावेळी केली. (वार्ताहर)

Web Title: Trying to fill the vacancy of the doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.