बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत
By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:12:06+5:302014-11-24T23:04:14+5:30
जीवन कांबळे : जामसंडे येथे प्रशिक युवा मंचच्यावतीने पुरस्कार वितरण सोहळा

बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत
जामसंडे : बहुजन समाजातील व्यक्तींनी त्यांचे राहणीमान उंचावले की आत्मकेंद्रीत न बनता संघटीत होऊन बहुजन समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवा, असे प्रतिपादन देवगडचे तहसीलदार जीवन कांबळे यांनी रविवारी जामसंडेमध्ये बोलताना व्यक्त केले. जामसंडेमध्ये रविवारी प्रशिक युवा मंचाच्या पुरस्कार वितरण आणि कवी गजानन पडेलकर यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
संविधानामुळे समाजाला अधिकार आणि कर्तव्य प्राप्त झाले. त्यामुळे शिक्षण दलितांपर्यंत पोहोचले. त्यामुळे बहुजन समाजाचे राहणीमान उंचावले. बहुजन समाजाच्या विकासासाठी बौद्धीक आणि व्यावहारिक पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. आत्मकेंद्रीतता ही बहुजनवर्गाच्या विकासाला पूरक गोष्ट नाही असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमात बोलताना विद्रोही साहित्यिक दादू मांजरेकर यांनी गौतम बुद्धांनी समतेचा संदेश जगाला दिला. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी त्यांचे विचार आचरणात आणावेत. आपली राज्यघटना म्हणजे जगण्याचे सामर्थ्य आहे असे सांगितले तर साहित्यिक उत्तम पवार यांनी बोलताना वर्तमानकाळात शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणल्याशिवाय आपणास प्रगती करता येणार नाही असे सांगितले. यावेळी मधुकर कांबळे, चंद्रकांत जामसंडेकर, सुनिल जाधव, रामचंद्र कदम, सूर्यकांत साळुंखे, जयचंद शिरगांवकर यांचा प्रशिक युवा मंचाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक युवा मंचाचे अध्यक्ष राजेंद्र मुंबरकर, माजी अध्यक्ष अजित जाधव, हिंदळे सरपंच अनुष्का हिंदळेकर, मोहन जामसंडेकर, राजन पडेलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल जाधव यांनी केले. (वार्ताहर)