ट्रक टेम्पो चालक संघाचे उपोषण
By Admin | Updated: November 12, 2014 23:20 IST2014-11-12T21:27:30+5:302014-11-12T23:20:54+5:30
साटेली गावातील प्रश्न : वेळेवर मोबदला न दिल्याने उपासमारीची वेळ

ट्रक टेम्पो चालक संघाचे उपोषण
सिंधुदुर्गनगरी : साटेली गावात अंदाधुंदी दादागिरी पद्धतीने मायनिंग चालवून गेली दोन वर्षे गाड्यांचा वापर करूनही वेळेवर कामाचा मोबदला न दिल्यामुळे येथील स्थानिक गाडी मालकांची जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीस धी डेक्कन मिनरल्स प्रा. लि. कंपनीचे मालक श्यामराव श्रीवास्तव व त्यांचे ठेकेदार समृद्धा रिसोर्सेस कंपनी जबाबदार असल्याचा आरोप करत संबंधितांवर उचित कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी साटेली येथील श्री देवी माऊली ट्रक-टेम्पो चालक-मालक हितवर्धक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
साटेली श्री देवी माऊली ट्रक टेम्पो चालक-मालक हितवर्धक संघाने जिल्हाधिकारी भवनासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ई. रवींद्रन यांना सादर करण्यात आले आहे. त्यात असे नमूद केले आहे की, साटेली गावात सन २००३ पासून मायनिंग चालू असून धी डेक्कन मिनरल्स प्रा. लि. कंपनीचे मालक श्यामराव श्रीवास्तव यांच्या नावावर साटेलीत मायनिंग सुरु आहे. सुरुवातीला डेक्कन मिनरल्स प्रा. लि. कंपनीने मायनिंग चालविले. त्यानंतर या कंपनीने दुसऱ्या कंपनीला भाडेतत्वावर चालविण्यास दिली. शेवटी सन २००५ ते २०१२ पर्यंत विदर्भ मायनिंग कंपनीने हे मायनिंग चालविले.
या काळात विदर्भ मायनिंग कंपनीने स्थानिक ग्रामस्थांना ट्रक, गाड्या घेण्यास प्रवृत्त केले. त्यानुसार येथील गरीब जनतेने साठवून ठेवलेले पैसे व घरे, इतर प्रॉपर्टी बँकांकडे तारण ठेवून कर्ज घेत ट्रक, गाड्या घेतल्या. विदर्भ मायनिंगच्यावेळी काम करून गाडीचा वर्षभरचा बँकेचा कर्जाचा हप्ता किंवा फायनान्सचा हप्ता, गाडीचा पासिंगचा खर्च भागवून गाडीमालकाला पोटापाण्यासाठी चार पैसे राहत होते. परंतु दादागिरीने मायनिंगवर राडा करून विदर्भ मायनिंग कंपनीला पिटाळून लावत समृद्धा रिसोर्सेस कंपनीने जबरदस्तीने साटेली मायनिंगवर ताबा घेतला. या समृद्धा रिसोर्सेस कंपनीने मायनिंगवर ताबा घेतल्यापासून साटेली गावातील गाडी मालकांवर संकट ओढवले आहे. या कंपनीने साटेलीतील ट्रकमालकांच्या गाड्यांचा सन २०१३ व सन २०१४ या दोन वर्षात वापर करून घेऊनही त्यांचा मोबदला दिलेला नाही. गेली दोन वर्षे मोबदला न दिल्यामुळे बँकांचे हप्ते थकीत होऊ लागले आहेत.
त्यामुळे बँकांनी गाड्या ओढून नेण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे गाड्यांसाठी बँकांकडे तारण ठेवलेली घरे, जमिनी आदी प्रॉपर्टी या कंपनीमुळे गमावण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे गेली दोन वर्षे गाड्यांचा वापर करूनही वेळेवर मोबदला न दिल्यामुळे येथील स्थानिक गाडी मालकांची जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीस धी डेक्कन मिनरल्स कंपनीचे मालक व त्यांचे ठेकेदार समृद्धा रिसोर्सेस कंपनी जबाबदार असल्यामुळे त्यांच्यावर उचित कारवाई करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी आमरण उपोषण छेडण्यात आले आहे.
या उपोषणास श्री देवी माऊली ट्रक-टेम्पा चालक मालक हितवर्धक संघ साटेलीचे अध्यक्ष प्रशांत साटेलकर, विठ्ठल जाधव, महादेव कोरगावकर यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)