बचत गट प्रशिक्षणात गैरव्यवहार!
By Admin | Updated: August 9, 2014 00:34 IST2014-08-08T21:28:37+5:302014-08-09T00:34:46+5:30
राजापूर तालुका : अधिकाऱ्यांच्या व्यवहारांबद्दल संशय

बचत गट प्रशिक्षणात गैरव्यवहार!
राजापूर : महिला बचत गट सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियानांतर्गत राजापूर पंचायत समितीमध्ये लाखो रुपयांचा गोलमाल झाला आहे. या अभियानावर काम करणारे अधिकारी तुपाशी व बचत गट मात्र उपाशी अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत महिला बचत गट सक्षम करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च केले. मात्र, त्याचा बचत गटांसाठी कोणताही फायदा होत नसून राजापूर तालुक्यात हे अभियान म्हणजे अधिकाऱ्यांसाठी कुरणच ठरले आहे. या अभियानांतर्गत महिला बचत गटांना दशसुत्रीप्रमाणे मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्षात काही किरकोळ गटांचीच मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली. मात्र, कागदी घोडे नाचवताना अधिकाऱ्यांनी सव्वादोनशेच्या आसपास बचत गट दाखवून लाखो रुपये गिळंकृत केले आहेत.
या अभियानांतर्गत महिला बचत गटांचे सदस्य तीन दिवसांच्या मार्गदर्शन शिबिराला हजर राहिले. त्या प्रत्येक सदस्याला दिवसाचा भत्ता, चहा, नाष्टा, स्टेशनरी यासाठी शासनाकडून अनुदान दिल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, प्रशिक्षण न देताच हे अनुदान खर्च करताना येथील अधिकाऱ्यांनी काही ग्रामसेवकांना हाताशी धरून बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणला व मोठा गोलमाल केला असल्याचे उघड होत आहे. तालुक्यात बचत गटांचे कोणतेही ट्रेनिंग अद्याप झालेले नाही. मात्र, त्यावर लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला आहे.यातील अनेक बचत गटांतील प्रशिक्षणार्थींना द्यावयाची स्टेशनरी अद्याप मिळालेली नसली तरी त्यावर खर्च करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत महिला बचत गटांना प्रशिक्षण देण्यासाठी तालुक्यातील सुमारे १८ जणांची निवड करण्यात आली होती. त्यांना प्रारंभी पंचायत समितीकडून प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील ६ ट्रेनर पुढे रूजू झाल्याने गेल्या फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत उर्वरित १२ ट्रेनर्सनी सुमारे दिडशे महिला बचत गटांना प्रशिक्षण दिले. मात्र, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सव्वादोनशे बचत गटांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून लाखो रूपये गिळंकृत केले. तालुक्यात अनेक ठिकाणी बचत गटांच्या अनेक सदस्यांना प्रशिक्षण मिळाले नसले तरी प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रचंड रक्कम लाटली गेल्याचे समोर येत आहे. या साऱ्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
येथील पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी सव्वादोनशे बचत गटांना प्रशिक्षण दिल्याचे दाखवून लाखो रूपये गिळंकृत केले. तालुक्यात बहुतांश ठिकाणी बचत गटांच्या अनेक सदस्यांना प्रशिक्षण मिळाले नसले तरी प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रचंड रक्कम लाटली गेल्याचे समोर येत आहे.