गांजाची वाहतूक एसटीतून !
By Admin | Updated: July 21, 2015 00:54 IST2015-07-21T00:53:50+5:302015-07-21T00:54:59+5:30
रिहाना काझी व सज्जाद ठाणगे यांना अटक

गांजाची वाहतूक एसटीतून !
दापोली : दापोली शहरातील काळकाई कोंडावरील गांजा प्रकरणात रिहाना काझी व सज्जाद ठाणगे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणातील तिसरा आरोपी पकडण्यात दापोली पोलिसांना यश आले असून, मिरज डेपोतील चालक अजिम बेग हा दापोलीत गांजा पुरवित असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दापोली पोलिसांनी बेग यांना मिरज येथून अटक केली आहे.
दापोली शहरात गेले अनेक दिवस गांजा राजरोसपणे विकला जात असल्याचे बोलले जात होते. गेल्या आठवड्यात काळकाई कोंडावरील जागरूक नागरिकांनी गांजा घेऊन जाणाऱ्या तरुणाचा पाठलाग करून पकडला होता. त्याने काळकाई कोंडावरील रिहाना काझी या महिलेने आपल्याला गांजा विकत दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलीस तपासात हा गांजा मिरज येथून येत असल्याचे उघड झाले. मिरज एसटी डेपोतील अजिम बेग हा मिरज-दापोली बसने गांजा घेऊन येत होता. तो आपल्याला गांजा विकत देत होता, असे पोलीस तपासात सांगितल्याने मोबाईलवरील संभाषणातून संशयित आरोपी बेग यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले व त्याला अटक केली.
बेग याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी यादव करीत आहेत. (प्रतिनिधी)