परिवर्तनवादी चळवळ एका छताखाली

By Admin | Updated: July 7, 2015 21:14 IST2015-07-07T21:14:57+5:302015-07-07T21:14:57+5:30

आठ चळवळींचा निर्णय : युवक, विद्यार्थ्यांनाही सामावून घेणार

Transformational movement under one roof | परिवर्तनवादी चळवळ एका छताखाली

परिवर्तनवादी चळवळ एका छताखाली

सावंतवाडी : जिल्ह्यातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी ‘आम्ही भारतीय’ या विचारमंचाखाली एकत्र येण्याचा निर्णय येथे आयोजित केलेल्या परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. येथील श्रीराम वाचन मंदिरात रविवारी परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांची चळवळ झाली. यावेळी राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मानवमुक्ती लढा, सत्यशोधकसमिती, विवेक वाहिनी, श्रीराम वाचन मंदिर, मुक्तांगण, तसेच शिक्षक वाङमय, आदी संघटना ‘आम्ही भारतीय’ या अनौपचारिक विचारमंचात एकत्र आल्या होत्या. यासंदर्भात पाचजणांची अस्थायी समिती स्थापन करण्यात आली. यात अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. विनोदसिंह पाटील, डॉ. गोविंद काजरेकर, प्रा. आर. के. संकपाळ यांचा समावेश आहे. बैठकीचे प्रास्ताविक डॉ. काजरेकर यांनी केले. त्यांनी, परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जिल्हा स्तरावर एकत्र येण्याची संकल्पना मांडली. त्यावर उपस्थितांनी विविध मते मांडून त्यावर सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सर्वानुमते ‘आम्ही भारतीय’ या नावाने विचारमंच स्थापन करून चळवळ पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गोपुरी आश्रमाचे प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी आपण राबविलेले दृष्टिकोन शिबिर, व्यसनमुक्ती शिबिर यासंबंधी माहिती दिली. तरुण पिढी चांगल्या मार्गाकडे वळावी. ती गोंधळली की, राजकीय मंडळी याचा फायदा घेतात, असे मत मांडले. त्यानुसार महाविद्यालयीन पातळीवर मुलांशी संवाद साधून त्यांना चळवळीत सहभागी करून घेण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, साठे साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल अ‍ॅड. संदीप निंबाळकर, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा. आर. के. संकपाळ, डॉ. गोविंद काजरेकर यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीला मंगल परुळेकर, डॉ. शरयू आसोलकर, अप्पाजी गावडे, शशी नेवगी, वीरधवल परब, सचिन देसाई, प्रा. देविदास बोर्डे, लीलाधर घाडी, राजेंद्र कांबळे, नंदू पाटील, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, प्रा. एल. पी. पाटील, सुनील भिसे, डॉ. जी. ए. बुवा आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Transformational movement under one roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.