रेल्वेने दहा म्हशींना चिरडले

By Admin | Updated: September 7, 2014 00:35 IST2014-09-07T00:22:55+5:302014-09-07T00:35:47+5:30

साकेडीजवळ कोकणकन्या एक्स्प्रेसला अपघात : रेल्वेवाहतूक विस्कळीत

The train crushed ten buffaloes | रेल्वेने दहा म्हशींना चिरडले

रेल्वेने दहा म्हशींना चिरडले

कणकवली : गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेसने साकेडी फाटकानजीक दहा म्हशींना चिरडले. आज, शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या सर्व म्हशी जानवली येथील शेतकऱ्याच्या असल्याची माहिती संबंधितांकडून मिळाली.
कोकणकन्या एक्स्प्रेस अकरा वाजता साकेडी फाटकावर आली असता रेल्वेच्या मोटरमनला समोर ट्रॅकवर चालणाऱ्या दहा म्हशी दिसल्या. त्याने गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र गाडीला वेग असल्याने दहाही म्हशींना ठोकर बसली. काही म्हशी रेल्वेखाली चिरडल्या, तर काही ठोकर बसून बाजूला उडाल्या. गाडीच्या इंजिनखाली आणि डब्यांखाली म्हशी अडकल्या होत्या.
या म्हशी जानवली येथील रेल्वेट्रॅकपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील असल्याचे स्थानिकांनी सांगितले. म्हशींच्या राखणदाराची नजर चुकल्याने त्या भरकटल्या व ट्रॅकवर आल्या. अपघात झाल्यानंतर राखणदार पळून गेला. अपघातानंतर ‘कोकणकन्या’ घटनास्थळीच थांबली होती. रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी तातडीने अपघात घडलेल्या ठिकाणी दाखल झाले. इंजिन व डब्यांखाली अडकलेल्या म्हशींना बाहेर काढण्यात आले. साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोकणकन्या मार्गस्थ करण्यात आली. या घटनेमुळे कणकवली रेल्वेस्थानकात दिवा व ओरोस स्थानकांत मांडवी एक्स्प्रेस थांबवून ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)
चाकरमान्यांची तारांबळ...
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाले असताना अचानक आज, शनिवारी सकाळी कोकणकन्याने दहा म्हशींना चिरडले. या अपघातामुळे सुमारे दोन तास कोकणकन्या रखडली होती. यामुळे कणकवली रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवाशांनी एकच गर्दी केली होती. या घटनेमुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती.
 

Web Title: The train crushed ten buffaloes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.