कुडाळात वाहतूक कोंडी
By Admin | Updated: November 16, 2014 23:44 IST2014-11-16T21:38:08+5:302014-11-16T23:44:14+5:30
अतिक्रमण वाढले : भोगटे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले

कुडाळात वाहतूक कोंडी
कुडाळ : कुडाळातील वाढते अतिक्रमण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा वाहतुकीचा खोळंबा आदी समस्यांबाबत कुडाळचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी पोलीस उपअधीक्षक व वाहतूक नियंत्रक विभागप्रमुख यांचे लक्ष वेधले. यावेळी पोलीस उपअधीक्षक यांनी या संदर्भात संबंधित विभागाची बैठक बोलावून या समस्या निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन भोगटे यांना दिले.
कुडाळमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढत आहेत. ही अतिक्रमणे वेळीच हटवावीत, यासाठी अनेक निवेदने, उपोषणे करण्यात आली. मात्र, संबंधित बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले. तसेच सर्व शासनाचे विभाग जबाबदारी झटकत आहेत.
यामुळे या शहरातील गाड्या पार्किंगचा प्रश्न वाढला असून कुडाळ पोलीस ठाणे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या शहरातील मार्गावर दिवसभर अनेकवेळा वाहतुकीचा खोळंबा होत आहे. यामुळे पादचारी, रुग्ण, विद्यार्थी तसेच वाहन चालक यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. शिवाय ध्वनी, वायू प्रदूषण होते, अशी कैफियत कुडाळ पोलीस ठाणे येथे पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे व वाहतूक नियंत्रक विभागाचे प्रमुख राजेंद्रकुमार परदेशी यांच्यासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे यांनी मांडली.
गेल्या चतुर्थीत कुडाळ पोलिसांनी वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी केलेले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. परंतु त्यानंतर त्यामध्ये सातत्य राहिले नाही, याबाबत भोगटे यांनी खंत व्यक्त केली.
यावेळी उपअधीक्षक गणेश इंगळे म्हणाले की, येथील वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणे ही समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून यासंदर्भात शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व संबंधित विभागाचे अधिकारी यांची एकत्र बैठक लावणार असल्याचे सांगितले.
वाहतूक नियंत्रक विभाग प्रमुख राजेंद्रकुमार परदेशी यांनी, आमच्या विभागाच्यावतीनेही चांगले सहकार्य देण्यात येईल व येथील वाहतूक कोंडीची समस्या चांगल्याप्रकारे सुटल्यास त्याचा सर्वांनाच फायदा होणार आहे, असे सांगितले.
यावेळी पोलीस सहाय्यक निरीक्षक आर. पी. पवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
उपाययोजना करा
कुडाळ येथील अतिक्रमणे हटविण्याबाबत तसेच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही केली.