आंबोलीतील पर्यटकांना मद्यपी युवकांकडून त्रास
By Admin | Updated: July 20, 2014 22:11 IST2014-07-20T22:01:43+5:302014-07-20T22:11:57+5:30
गुजरात येथील पर्यटकांना मद्यधुंद पर्यटकांकडून नाहक त्रास

आंबोलीतील पर्यटकांना मद्यपी युवकांकडून त्रास
सावंतवाडी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या गुजरात येथील पर्यटकांना मद्यधुंद पर्यटकांकडून नाहक त्रास देण्याचा प्रकार रविवारी घडला. या आंबटशौकीन मद्यपी पर्यटकांनी गुजरात येथील महिला पर्यटकांशी छेडछाड करून त्यांच्या कारचेही नुकसान केले. या प्रकाराकडे पोलिसांनीही दुर्लक्ष केल्याचा आरोप कारचालक विश्वास विष्णू पेडणेकर यांनी करून येथील पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी विविध भागातील हजारो पर्यटकांची गर्दी झाली होती. विश्वास पेडणेकर हे गुजरात येथील काही पर्यटकांना घेऊन आंबोली येथे गेले होते. सायंकाळी कावळेसाद येथून परतताना वाहतूक कोंडी झाल्याने गाड्यांची गतीही अत्यंत धिमी असल्याचा फायदा घेऊन काही मद्यधुंद पर्यटकांनी पेडणेकर यांच्या इनोव्हा कारच्या काचांवर हात मारण्यास सुरुवात केली. पेडणेकर यांनी जाब विचारला असता, या आठ युवकांच्या टोळक्याने त्यांना उध्दट उत्तरे देत धक्काबुक्कीही केली. एवढ्यावरच न थांबता कारमधील महिला आणि युवतींची छेडछाड काढण्यास सुरुवात केली. सुमारे दोन किलोमीटरपर्यंत हा प्रकार सुरू होता. परंतु स्थानिकांनी अथवा पोलिसांनी हा प्रकार थांबविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. अखेर पेडणेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात अज्ञात युवकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.
आंबोलीत आलेल्या महिला पर्यटकांची छेडछाड सुरू असताना पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच रविवारी आंबोलीत पर्यटकांची संख्या जास्त असल्याने या दिवशी पोलिसांची कुमक वाढवावी, अशी मागणीही पर्यटक तसेच ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. (वार्ताहर)