पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची!
By Admin | Updated: September 28, 2015 23:33 IST2015-09-28T22:16:50+5:302015-09-28T23:33:45+5:30
पर्यटन दिन चर्चासत्र : पर्यटकांसाठी लाईफ जॅकेट सक्तीवर एकमत

पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची!
मालवण : पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी तारकर्ली-देवबागला पहिली पसंती देणाऱ्या पर्यटकांचे उत्साहाच्या भरात आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत. शासनस्तरावर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत उपयोजनाची कार्यवाही प्रस्तावित आहे. तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे मालवण किनारपट्टीवर देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात येईल. तर पर्यटकांना समुद्रस्नान व पर्यटनाचा मनमुराद आनंद किनारपट्टीवर लुटता यावा यासाठी सुरक्षित किनारे ही संकल्पनाही राबवली जाणार आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने तारकर्ली पर्यटन व्यावसायिक संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पर्यटन चर्चासत्रात सर्वच व्यावसायिकांनी पर्यटकांची सुरक्षितता महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले.येथील हॉटेल महाराजा येथे टीटीडीएस संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या अध्यक्षतेखाली या चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. यावेळी विजय केनवडेकर, गुरू राणे, अविनाश पराडकर, अरविंद मोंडकर, अभय पाटकर, सुरेश मसुरकर, महेश मांजरेकर, रुपेश प्रभू, सचिन गोवेकर, नंदुकमार सावंत, गणेश कुशे, अनंत मयेकर, प्रसन्नकुमार मयेकर, यशोधन पडवळ, अवधूत चव्हाण, महेश सावंत, रुजाय फर्नांडिस, मिथीलेश मिठबावकर, नारायण माडये, बबन शेलटकर, समित कोळगे, पंकज पेडणेकर उपस्थित होते.
राज्य शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय पर्यटन विकास समिती गठीत करण्याचे निर्देश दिलेले आहेत. मात्र, प्रशासनाकडून चलढकलपणा केला जात आहे. ही समिती गठीत झाल्यास त्यात जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था तसेच उद्योजकांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सर्व अधिकारी व पदाधिकारी हे पर्यटन विषयातील पदवीधर असावेत. बदली म्हणून इतर खात्यातील कर्मचारी महामंडळाच्या सेवेत आणू नयेत. जिल्ह्यातील पर्यटनवृद्धीसाठी अद्यावत संकेत केंद्र निर्माण करावेत. पर्यटन महामंडळाचे प्रकल्प चालविण्याचा ठेका स्थानिक संस्थांनाच देण्यात यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. पर्यटन राज्यमंत्र्यांची मंगळवारी २९ रोजी भेट घेण्यात येणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)
खासगी जीवरक्षक नियुक्त करणार
तारकर्ली आणि देवबाग येथे गेल्या दीड महिन्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांच्या मृत्यूबाबत गांभिर्याने चर्चा करण्यात आली. लाईफ जॅकेट सक्तीचे करण्यावर एकमत केले.
शासनाकडे सुमारे एक हजार लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्याची मागणी करण्याचेही ठरविण्यात आले.
देवबाग, तारकर्ली, मालवण, धुरीवाडा, दांडी या परिसरात खासगी जीवरक्षक नियुक्त करून त्यांना संस्थेच्यावतीने पगार देण्यात यावा, असेही सूचविले.