शासनाच्या जाचक अटींमुळे पर्यटन व्यावसायिकांना त्रास
By Admin | Updated: July 13, 2015 00:35 IST2015-07-12T23:11:43+5:302015-07-13T00:35:57+5:30
व्यावसायिकांची नाराजी : बंदर अधिकाऱ्यांशी चर्चा

शासनाच्या जाचक अटींमुळे पर्यटन व्यावसायिकांना त्रास
मालवण : पर्यटन व्यावसायिकांनी प्रवासी वाहतूक होड्यांच्या सर्वेसाठी सर्व कागदपत्रे दाखल करूनही गेली तीन चार वर्षे सर्व्हे करण्यात आला नसल्याने व्यावसायिकांना व्यवसाय करता येत नाही. मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मेरिटाईम बोर्डाने पर्यटन नौकांसाठी जाचक अटी घातल्याने भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांनी मेरिटाईम बोर्डाचे बंदर अधिकारी कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांची भेट घेऊन चर्चा केली.
मेरिटाईम बोर्डाने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय करणाऱ्या संस्था व व्यक्तींना दिलेला रजिस्टर नंबर रद्द करून आयव्ही अॅक्ट १९१७ अंतर्गत नोंदणी करणे, नौकांचा सर्व्हे करणे, प्रवासी वाहतूक परवानगी, तिकीट दर प्रस्ताव मंजुरी, नेव्हल आर्किटेक्ट प्लान बनविणे अशा जाचक अटी शिथिल करावी अशी मागणी गेली. पर्यटन व्यावसायिकांनी मांडलेली भूमिका वरिष्ठ कार्यालयाशी पाठवून शिथिलीकरणासाठी प्रयत्न केला जाईल असे कॅप्टन व्ही. एच. इंगळे यांनी सांगितले. बंदर विभागाच्यावतीने होडी वाहतूक संघटना, पर्यटन जलक्रीडा संघटना यांची संयुक्त बैठक बंदर विभाग कार्यालयात आयोजित केली होती. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, तारकर्ली सरपंच मोहन केळुसकर, मेघनाद धुरी, घन:श्याम कुबल, रामचंद्र कुबल, सदानंद तांडेल, बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर उपस्थित होते. (वार्ताहर)
भाजपाचे शिष्टमंडळ आज मंत्र्यांना भेटणार
मालवण येथील पर्यटन व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी राज्याचे बंदर राज्यमंत्री रणजीत पाटील यांची भाजपाचे शिष्टमंडळ १३ जुलै रोजी भेट घेणार असल्याचे बाबा मोंडकर यांनी सांगितले.