पर्यटन व्यावसायिकांनी नोटिसा स्वीकारून आपली बाजू मांडावी
By Admin | Updated: March 28, 2015 00:07 IST2015-03-27T22:12:21+5:302015-03-28T00:07:32+5:30
पोलिसांचे आवाहन : पर्यटन व्यावसायिक नोटिसा स्वीकारण्यास तयार

पर्यटन व्यावसायिकांनी नोटिसा स्वीकारून आपली बाजू मांडावी
मालवण : सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा नाकारणाऱ्या तारकर्ली व देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांनी शुक्रवारी पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले यांची भेट घेऊन या नोटिसा स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यावर बुलबुले यांनी संबंधित व्यावसायिकांनी नोटिसा स्वीकारून १ एप्रिल रोजी पोलिसांसमवेत एकत्रित बैठक घेऊन उपलब्ध कागदपत्रांसहीत आपली बाजू मांडावी, असे सांगितले.
अनधिकृत बांधकामप्रकरणी महसूल विभागाने स्कुबा डायव्हींग सेंटरसह तारकर्ली व देवबाग येथील २३ पर्यटन व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले होते. यानंतर पोलिसांनी बजावलेल्या नोटिसा या व्यावसायिकांनी प्रथमत: नाकारल्या होत्या. मात्र, शुक्रवारी भाजपा तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली या पर्यटन व्यावसायिकांनी पोलिसांची भेट घेऊन नोटिसा स्वीकारण्यास तयारी दर्शवली. यावेळी बाबा मोंडकर यांनी या व्यावसायिकांची बाजू मांडताना यापूर्वीही प्रशासनाकडून बजावण्यात आलेल्या नोटिसांना व्यावसायिकांनी उत्तरे दिली होती. मात्र, त्या उत्तरांनी प्रशासनाचे समाधान न झाल्याने आता फौजदारी कारवाई करण्यात आली आहे, असे सांगितले. तारकर्ली- देवबाग भागात पर्यटन वाढीस मोठा वाव असताना केवळ कायद्यांतील त्रुटींमुळे पर्यटन व्यवसायास अडथळे येत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर दाखल झालेले गुन्हे अन्यायकारक आहेत, असे सांगून तहसील कार्यालयापासून जवळच असणाऱ्या मालवणातील काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई का केली जात नाही, असा सवालही मोंडकर यांनी उपस्थित केला. मोंडकर यांनी पर्यटन व्यावसायिकांवरील अन्याय दूर करण्यात पोलिसांचेही सहकार्य आवश्यक आहे, असे सांगितले. पोलीस निरीक्षक बुलबुले यांनी कारवाईच्या प्रक्रियेत व्यावसायिकांनीही सहकार्य करून या नोटीसा स्विकाराव्यात. तसेच एकत्रित बैठकीत आपली बाजू मांडावी, असे सांगितले. (प्रतिनिधी)