पर्यटन बारमाही उत्पन्न देणारा उद्योग
By Admin | Updated: February 12, 2015 00:34 IST2015-02-11T21:52:48+5:302015-02-12T00:34:12+5:30
आर. पी. निर्मळ : वालावल येथे शेतकरी मेळावा

पर्यटन बारमाही उत्पन्न देणारा उद्योग
कुडाळ : शासनाच्या विविध योजनांची सखोल माहिती घेऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. पर्यटन हा १२ महिने उत्पन्न देणारा उद्योग असून त्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ यांनी केले. वालावल येथे मनोरमा चौधरी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे होते. यावेळी प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वालावलचे सरपंच राजेश प्रभू, शिवसेना शाखाप्रमुख संजोग साळसकर, ट्रस्टचे सचिव संदीप साळसकर, तंटामुक्ती अध्यक्ष
घनशाम वालावलकर, आदी उपस्थित होते.
मेळाव्याची प्रस्तावना करताना चौधरी यांनी मेळाव्याची उद्दिष्ट्ये शेतकऱ्यांसमोर मांडली. सरपंच राजेश प्रभू यांनी, गावाच्या विकासात कोणतेही राजकारण न आणता ग्रामपंचायतीमार्फत लागणारे संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर म्हणाले, गावातील तरुणांचे शेतकरी गट बनवून त्यांना इतर राज्यातील शेतीपूरक प्रकल्प दाखविणे आवश्यक आहे.
सभाध्यक्ष अतुल बंगे यांनी, लक्ष्मीनारायण तलावातून पाझरणारे पाणी बंद करून त्या पाण्याचा उपयोग बाराही महिने शेतकऱ्यांना कसा होईल, यासाठी केंद्राचे पर्यटनमंत्री रवी नाईक यांच्या माध्यमातून पर्यटनाच्या हेडखाली निधी आणून तलावातील गाळ काढून, त्याचे सुशोभीकरण व चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक करण्याकरिता चौधरी ट्रस्टच्या सहकार्यातून प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्यावतीने विष्णू वालावलकर, नाथा हिंदळेकर, मीनानाथ कोचरेकर यांनी विचार मांडले.
मेळाव्याचे प्रास्ताविक व आभार संदीप साळसकर यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी दादू कोळंबकर, संतोष मुणगेकर, सुनील करवडकर, सागर वालावलकर, महेन जाधव, चैतन्य वालावलकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)