जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांसाठी सहल
By Admin | Updated: January 7, 2015 23:53 IST2015-01-07T22:38:22+5:302015-01-07T23:53:27+5:30
कृषी विभागातर्फे आयोजन

जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांसाठी सहल
सिंधुदुर्गनगरी : कृषी विभागामार्फत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्ह्यातील ४३ शेतकऱ्यांसाठी जानेवारी २०१५ मध्ये शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली.राज्यामध्ये कृषी क्षेत्रात झालेला बदल, कृषी तंत्रज्ञानाबाबत झालेली प्रगती, निरनिराळ््या पीक लागवड पद्धतीने माहिती शेतकऱ्यांना होण्यासाठी संशोधन केंद्रे, कृषी विद्यापीठे व प्रगतशील शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रास भेटी देऊन शेतकऱ्यांना माहिती देण्यात येते. तसेच प्रगतशील शेतकऱ्यांचे अनुभव शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतात. त्यासाठी या शेतकरी सहलीचे कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आयोजन करण्यात आले आहे.
शेतकरी सहलीसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी प्रवेश अर्जासोबत सातबारा उतारा जोडणे आवश्यक असून या शैक्षणिक सहलीचा प्रवास खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुक्कामाची सोय, दैनंदिन गरजा व जेवणाचा खर्च शेतकऱ्यांनी स्वत: करावयाचा आहे.
सहल कालावधीमध्ये प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. वैद्यकीय समस्या किंवा कोणताही आजार उद्भवल्यास येणारा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे. तसेच गंभीर आजार असल्यास तशी नोंद प्रवेश अर्जामध्ये करावयाची आहे.
अर्जदार शेतकऱ्यांनी प्रवेश अर्जासोबत अनामत रक्कम ५०० रूपये कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडे भरणा करावयाची असून शेतकरी सहल प्रत्यक्ष सुरू झाल्यावर भरणा केलेली अनामत रक्कम ५०० रूपये शेतकऱ्यास परत केली जाईल. इच्छुक शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)