शौचालयाचे पाणी नदीत; संताप व्यक्त
By Admin | Updated: November 14, 2014 23:18 IST2014-11-14T22:58:50+5:302014-11-14T23:18:01+5:30
अजमल पटेल : गोवळकोटमधील प्रकार

शौचालयाचे पाणी नदीत; संताप व्यक्त
चिपळूण : शहरातील गोवळकोट भागातील सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष अजमल पटेल यांनी केली आहे.
सर्वत्र स्वच्छता मोहिमेचा नारा दिला जात आहे. विविध खात्यांचे अधिकारीही हातामध्ये झाडू घेऊ लागले आहेत. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे. गोवळकोट व अन्य भागात सध्या मोठमोठ्या इमारतींची बांधकामे सुरु आहेत. यासाठी ठेकेदार परप्रांतीय मजूर घेऊन ही कामे करीत आहेत. ठेकेदाराने संबंधित कामगारांचा शौचालयाचा प्रश्न सोडविणे महत्त्वाचे आहे. मात्र, बांधकामावर काम करणारे काही कामगार सकाळच्या वेळी गोवळकोट जॅकवेल परिसरात शौचास बसतात. तसेच काही मटण, मच्छी विक्रेते नदीपात्रातच कोंबड्यांचे अवशेष टाकत असल्याचे चित्र आहे. या भागात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीपात्रातच सोडण्यात आले असल्याने संभाव्य आरोग्यास या पाण्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पटेल यांनी व्यक्त केली.
घर तेथे शौचालय अशी शासनाची भूमिका असून, बांधकाम करणारे व्यावसायिक कामगारांसाठी स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करीत नसल्याची स्थिती दिसून येत आहे. या प्रकारामुळे अस्वच्छता वाढली आहे. सार्वजनिक शौचालयांबाबत नगर परिषद प्रशासनाने योग्य ती दखल घेणे गरजेचे आहे. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे पटेल यांनी सांगितले. नगर परिषद प्रशासन व विविध खात्याचे अधिकारी सध्या स्वच्छता मोहिमेतून पुढे येत आहेत.
मात्र, नागरिकांनीही या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे, असे पटेल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (वार्ताहर)
नागरिक संतापले...
चिपळूण शहरातील गोवळकोट या गजबजलेल्या भागात सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत सोडल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकाराने नागरिक संतप्त झाले असून, प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
सार्वजनिक शौचालयाचे पाणी नदीत.
माजी नगराध्यक्ष अजमल पटेल झाले आक्रमक.
पालिका प्रशासनावर हल्लाबोल.
स्वच्छता मोहीम सुरू असताना या प्रकाराने नागरिक संतप्त.
आरोग्यास धोका निर्माण झाल्यास पालिका जबाबदार.
स्वच्छतेसाठी प्रयत्न आवश्यक, प्रशासनावर जबाबदारी मोठी.