काँग्रेसकडून टोपीवाला आय.टी.आयला पुन्हा घेराओ
By Admin | Updated: October 30, 2015 23:10 IST2015-10-29T23:50:29+5:302015-10-30T23:10:49+5:30
आर. जी. कोकणेंचा प्रताप : प्राचार्यांसमोर विद्यार्थ्यांकडून वाभाडे

काँग्रेसकडून टोपीवाला आय.टी.आयला पुन्हा घेराओ
सावंतवाडी : सावंतवाडीतील टोपीवाला आयटीआयमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत गुरूवारी प्राचार्य एस. के. व्यादंडे यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी शिक्षक आर. जी. कोकणे हे विद्युत विभागाचे प्रात्यक्षिक दुकानात जाऊन करा, मी शिकवणार नसल्याचे सांगत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी प्राचार्यांसमोर करत कोकणे यांच्या कारभाराचे वाभाडे काढले. यावेळी प्राचार्यानी कोकणे यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडीतील टोपीवाला आयटीआयमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. यावर पंधरा दिवसा पूर्वी काँग्रेसने जोरदार आंदोलन केले होते. तसेच २९ आॅक्टोबर पर्यतची डेडलाईन दिली होती. त्यानूसार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब, सभापती प्रमोद सावंत, जिल्हा परीषद सदस्य प्रमोद कामत, डॉ. जयेंद्र परूळेकर, सुधीर आडिवडेकर, सुनिल पेडणेकर, दिलीप भालेकर, गौरग रेगे आदिंनी आयटीआयमध्ये प्राचार्य व्यादंडे यांची भेट घेतली.
यावेळी काही काळ प्राचार्र्यानी शिक्षक नसून एक शिक्षक चार-चार ठिकाणी सेवा बजावतो, असे सांगितले. त्यावर काँग्रेस पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. तुमच्याकडे शिक्षक नाहीत तर तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान का करता असा सवाल केला. कोकणातील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करू नका, याचे वाईट परिणाम होतील. तुम्ही पालकमंत्र्यांना याबाबत किती वेळा भेटला, ते तुम्हाला मदत करत नाही का? असा सवालही काँग्रेसने उपस्स्थित केला.
दरम्यान, याचवेळी प्राचार्य व्यांदडे यांना भेटण्यासाठी विद्यार्थी तेथे पोचले आणि त्यांनी प्राचार्याकडे शिक्षकांच्या कारभाराबाबत नाराजी व्यकत केली. विद्युत विभागाचे शिक्षक आम्हाला आयटीआयमध्ये काही शिकवत नाही आणि बाहेरील दुकानात जावून ट्रेनिंग घ्या, म्हणून सांगतात. विद्यार्थ्यांकडून आटीआय साफसफाई करून घेतली जाते. नव्या इमारतीमध्ये आम्ही बसणार नाही. कारण तेथे पत्रे खराब झाले असून हे पत्रे केव्हाही खाली कोसळू शकतात. त्यामुळे प्राचार्यांनी इमारतीची हमी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. तसेच प्राचार्याना चांगलेच धारेवर धरले कॉग्रेसने विद्यार्थ्यांची बाजू उचलून धरत कोकणे यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी प्राचार्य व्यांदडे यांनी कोकणे यांना लवकरच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी शांत झाले. मात्र, काँग्रेसने १५ नोव्हेंबर पर्यतची डेडलाईन आयटीआयला दिली असून येथील सर्व समस्या मार्गी लावा अन्यथा आम्हाला उपोषण करावे लागेल, असा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)
काँग्रेसचे आंदोलन विद्यार्थ्यांनी घेतले ताब्यात
आजच्या आंदोलनात काँग्रेसचा आक्रमकपणा कमी जाणवत होता. मात्र, परीक्षा संपल्यानंतर खुद्द विद्यार्थ्यांनीच प्राचार्यांना अनेक प्रश्नावर कोंडीत पकडत काँग्रेसचे आंदोलन हातात घेतले.
त्यावर प्राचार्यांनी विद्यार्थ्याचे सर्व मुद्दे लिहून घेत मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. शिक्षक सोडा पण प्राचार्यानाच आम्ही पहिल्यांदा बघत असून ते कधी इकडे येत नाहीत.
असे विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या समोरच सांगताच प्राचार्यानी विद्यार्थी बोलत असल्याचे खरे, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेसचे पदाधिकारी येणार अशी माहिती शिक्षक आर. जी. कोकणे यांना समजताच, त्यांनी आयटीआयमधून काढता पाय घेतला.