आजचे शिक्षक उपक्रमशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2015 00:10 IST2015-04-26T21:53:21+5:302015-04-27T00:10:16+5:30
चंद्रकांत अणावकर : कणकवलीत विद्यार्थी दत्तक सोहळ्याचे आयोजन

आजचे शिक्षक उपक्रमशील
कणकवली : शासन तसेच प्रशासनाच्या चुकांमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा त्रास प्राथमिक शिक्षकांना सहन करावा लागत आहे. तरीही प्राथमिक शिक्षक विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करीत असून यापुढेही विद्यादानाचे पवित्र कार्य त्यांनी असेच सुरू ठेवावे. संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे सल्लागार चंद्रकांत अणावकर यांनी केले.
येथील कणकवली महाविद्यालयाच्या एचपीसीएल सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्यावतीने रविवारी रक्तदान शिबिर तसेच विद्यार्थी दत्तक सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. समितीचे जिल्हाध्यक्ष राजन कोरगावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य सहसचिव किसन दुखंडे, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, श्रीकृष्ण नानचे, नामदेव जांभवडेकर, नाना देसाई, कणकवली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी शिंदे, संतोष पाताडे, नितीन कदम, दिलीप कदम, तालुका समिती अध्यक्ष गिल्बर्ट फर्नांडिस, सरचिटणीस संतोष कुडाळकर, प्रसाद कांबळी, मंगेश मुद्रस, राजेंद्रप्रसाद मणेरीकर आदी यावेळी उपस्थित होते.
अणावकर म्हणाले, प्राथमिक शाळांच्या गुणवत्तेबाबत शिक्षणतज्ज्ञ अथवा शिक्षणमहर्षी चर्चा करीत नाहीत. शाळेच्या माध्यमातून सुसंस्कृत व सुशिक्षित मुले बनली पाहिजेत, यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. संघटना त्यांच्या नेहमीच पाठीशी राहील.शैक्षणिकदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम करण्यासाठी सर्वांनी
एकदिलाने काम करूया, असे डॉ. संभाजी शिंदे म्हणाले. सुरेखा कदम, नाना देसाई, गिल्बर्ट फर्नांडिस, राजन कोरगावकर आदी मान्यवरांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. (वार्ताहर)
२५ विद्यार्थी दत्तक
आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या तसेच आई-वडील नसलेल्या २५ विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने दत्तक घेण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक खर्च समितीच्यावतीने केला आहे.
३५ दात्यांचे रक्तदान
प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने आयोजित केलेल्या शिबिरात ३५ दात्यांनी रक्तदान केले.