मठ येथे आज जनसुनावणी

By Admin | Updated: July 15, 2015 00:18 IST2015-07-14T21:58:57+5:302015-07-15T00:18:19+5:30

मायनिंग प्रकल्प : भाजप, मनसे, काँग्रेस ग्रामस्थांच्या बाजूने --काँग्रेस मायनिंगविरोधी भूमिकेवर ठाम : परूळेकर

Today's public hearing at Math | मठ येथे आज जनसुनावणी

मठ येथे आज जनसुनावणी

वेंगुर्ले : मठ येथील नियोजित मायनिंगच्या विरोधात राजकीय पक्षांनीही आपली भूमिका स्पष्ट केली असून मनसे व भाजपाच्या स्थानिक कमिटीने आपण ग्रामस्थांच्या बाजूने असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, बुधवार १५ जुलै रोजी जनसुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले.मठ गावाला ८00 वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती व नैसर्गिकदृष्टया समृद्ध असा हा परिसर आहे. दुर्मिळ वनश्रीने आणि परिश्रमपूर्वक निर्माण केलेल्या फळबागांनी हा गाव नटलेला आहे. परंतु या मठ-सतये-वेंगुर्ले गावाकडे मायनिंग लॉबीची नजर वळली आहे. या मायनिंगमुळे आपली जन्मभूमी भकास होणार असून या पाण्याची पातळी खालावणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक व राष्ट्रीय नेत्यांची नावे सांगून लोकांची दिशाभूल करीत आहेत. याकरीता मठ येथील भाजपाच्या स्थानिक कमिटीचा पर्यावरणाला धोकादायक ठरणाऱ्या या सिलिका मायनिंग प्रकल्पाला विरोध असून १५ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीला जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहून प्रकल्पाला विरोध करुया, असे आवाहन केले आहे. यावेळी स्थानिक भाजप कमिटीचे विरेंद्र सावंत, दिनार मराठे, ओंकार मराठे, केशव ठाकूर, संजय बोवलेकर, सागर बोवलेकर, राजू गुरव, श्रीनिवास फाटक उपस्थित होते.मनसे कोकण विभाग संघटक परशुराम उपरकर यांनी जनसुनावणीबाबत मठ-सतये-वेंगुर्ले निशाण तलाव बचाव समिती सदस्य व ग्रामस्थांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थांनी एकजुटीने बाह्यशक्तीचा मुकाबला करण्याचा निर्धार केला. यावेळी तालुका संघटक भिकाजी पवार, बचाव समितीचे सचिव अजित धुरी, ग्रामस्थ महेश धुरी, सुधीर धुरी, स्वप्नील धुरी, उमेश धुरी, सुहास धुरी, संजय धुरी आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

काँग्रेस मायनिंगविरोधी भूमिकेवर ठाम : परूळेकर
वेंगुर्ले : वेंगुर्ले-मठ-सतये येथील मायनिंग प्रकल्पाची केंद्र व राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून प्रकल्पास मिळालेली मंजुरी रद्द करावी, या मागणीसह राष्ट्रीय काँग्रेस प्रकल्पग्रस्तांबरोबर खंबीरपणे उभे राहून १५ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीस मायनिंग विरोधी भूमिकेवर ठाम राहणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत सांगितले.
वेंगुर्ले-मठ-सतये येथील मायनिंग प्रकल्प तीन ऋतूंच्या दीड वर्षांच्या अभ्यासाअंती पर्यावरण आघात अहवाल तयार केला जातो व हा अहवाल केंद्र व राज्य सरकारकडे सादर केला जातो. त्यानंतर प्रकल्पास मंजुरी मिळते. मात्र, शासनाकडे सादर झालेला अहवाल चुकीचा असून कें द्र व राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून प्रकल्पास मिळालेली मंजुरी रद्द करावी, या मागणीसह राष्ट्रीय काँग्रेस प्रकल्पग्रस्तांबरोबर खंबीरपणे उभे राहून १५ जुलै रोजी होणाऱ्या जनसुनावणीस मायनिंग विरोधी ठाम राहणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले. पालकमंत्री एकीकडे पर्यटनातून विकासाचा आराखडा आखत असताना दुसरीकडे मात्र मठ-सतये मायनिंगबाबत मूग गिळून गप्प असल्याचा आरोप डॉ. परूळेकर यांनी केला. शिवसेनेने आपली ठाम भूमिका मांडावी. सिलिका मायनिंग व आरोंदा-रेडी सिलिका वॉशिंग प्लान्ट यांच्यात संंबंध असून येत्या काळात ते जनतेसमोर आणून ‘त्या’ व्यक्तीचे खरे वरूप लोकांसमोर येणार असल्याची टीका डॉ. परूळेकर यांनी केली. यावेळी वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी, उपसभापती स्वप्निल चमणकर, होडावडा सरपंच राजबा सावंत, तुळस सरपंच श्रीनिवास मराठे, पंचायत समिती सदस्य चित्रा कनयाळकर, मठ सरपंच स्रेहलता ठाकूर, दादा कुबल, विलास ठाकूर, वसंत तांडेल, प्रशांत आजगावकर, पपू परब, मारुती दौडनशेटी, विकास चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Today's public hearing at Math

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.