रत्नागिरी ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन
By Admin | Updated: January 15, 2015 00:24 IST2015-01-15T00:23:49+5:302015-01-15T00:24:06+5:30
स्नेहमेळाव्याचे आयोजन : संग्राह्य कृषी विशेषांकाचे प्रकाशन होणार

रत्नागिरी ‘लोकमत’चा आज वर्धापनदिन
रत्नागिरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या व वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ‘लोकमत’च्या रत्नागिरी आवृत्तीचा आठवा वर्धापनदिन उद्या, गुरुवारी साजरा होत असून, त्यानिमित्त कृषी विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमाबरोबरच स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने गेल्या आठ वर्षांत सामाजिक बांधीलकी जपत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, आदी विषयांवर सतत विविधांगी लेखन केले आहे. विविध विषयांवरील पुरवण्यांसह नि:पक्षपातीपणे आणि निर्भिडपणे जनतेच्या समस्या मांडल्या आहेत. एवढेच नव्हे, तर सामाजिक उपक्रमांतही ‘लोकमत’ने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे काही वर्षांतच सामान्य वाचकांच्या मनात आपुलकी निर्माण केली आहे.
आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून उद्या सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळच्या सत्रात ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या कृषी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कृषी विषयात झालेले प्रयोग, यांत्रिक प्रगती, वाढती बागायत
यावर या क्षेत्रातील तज्ज्ञांचे तसेच हे प्रयोग करणाऱ्या शेतकरी-बागायतदारांचे माहितीपूर्ण लेख या पुरवणीत समाविष्ट आहेत.
‘लोकमत’च्या या स्नेहमेळाव्याला अधिकाधिक वाचक, हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, वरिष्ठ शाखाधिकारी अतुल कामत, आवृत्तीप्रमुख मनोज मुळ्ये यांनी केले आहे. (प्रतिनिधी)