तिल्लोरी कुणबी समाज एकवटला

By Admin | Updated: August 12, 2014 23:23 IST2014-08-12T22:08:27+5:302014-08-12T23:23:57+5:30

विविध मागण्या : हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Tillori Kunabi society united | तिल्लोरी कुणबी समाज एकवटला

तिल्लोरी कुणबी समाज एकवटला

रत्नागिरी : अनुसूचित जमातीचे (एस. टी.) आरक्षण मिळावे, यासाठी आता रत्नागिरी जिल्ह्यातील तिल्लोरी कुणबी समाज एकवटला असून, आज (मंगळवार) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर हा समाज धडकला. या मोर्चात हजारो कुणबी बांधव सहभागी झाले होते. कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय जाणार नाय, तिल्लोरी कुणबी समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशा घोषणा देत आज या समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मारूती मंदिर येथील शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत या मोर्चाला प्रारंभ झाला. माळनाका येथील कुणबी समाजाचे नेते श्यामराव पेजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार करून हा मोर्चा पुढे सरकला. मोर्चात सहभागी झालेल्या कुणबी बांधवांची संख्या अधिक असल्याने वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. काही काळ वाहतूकही खोळंबली होती.
हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी प्रमुख गोपीनाथ झेपले, सुजित झिमण, दौलतराव पोस्टुरे आदी नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण मिळण्यासाठी विविध पक्षांमध्ये असलेल्या सर्व बांधवांनी आरक्षणासाठी एका छत्राखाली यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या मोर्चात सर्व तालुक्यांतील प्रमुख नेत्यांसह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना कोकण तिल्लोरी कुणबी आरक्षण संघर्ष समितीतर्फे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये गोपीनाथ झेपले, सुजित झिमण, दौलतराव पोस्टुरे, रामचंद्र गराटे, अस्मिता केंदे्र, सुरेखा खेराडे, गणेश जोशी, शंकर कांगणे, राजाभाऊ कातकर यांचा समावेश होता.
रायगड, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणेसह मुंबई भागात तिल्लोरी कुणबी समाज सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय आदी क्षेत्रात मागासलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीची भरती परजिल्ह्यातून केली जाते. काही दिवस सेवा केल्यानंतर तो नोकरवर्ग आपल्या जिल्ह्यामध्ये बदली करून घेतो. त्यामुळे त्या जागा परत रिक्त राहतात. त्यामुळे उपेक्षित आलेल्या कुणबी समाजाला इतर समाजाच्या तुलनेने बरोबरीने आणण्यासाठी घटनेने दिलेल्या हक्कानुसार अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी एस. आर. बर्गे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर समाजबांधव येणार हे गृहीत धरून आयोजकांनी २५ तरूणांचे एक विशेष पथक तयार केले होते. मोर्चेकऱ्यांमध्ये विस्कळीतपणा येत असल्याचे लक्षात येताच हे युवक पुढे येऊन मोर्चेकऱ्यांना शिस्तबध्द रितीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे घेऊन जात होते.
या मोर्चासाठी शीघ्र कृती दल तैनात ठेवलेले पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते. कारण या दलाचा वापर दंगल नियंत्रणासाठी केला जातो. मात्र, आज बंदोबस्तासाठी या दलाचा वापर केला होता. मोर्चा प्रवेशव्दारावर धडकला, तेव्हा जमाव रोखताना या दलाची चांगलीच तारांबळ उडालेली दिसून येत होती.

Web Title: Tillori Kunabi society united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.