तेंडोली येथे बिबट्यास जीवदान

By Admin | Updated: July 19, 2015 00:31 IST2015-07-19T00:31:54+5:302015-07-19T00:31:54+5:30

अजून तीन बिबटे

Tibetan survival at Tendoli | तेंडोली येथे बिबट्यास जीवदान

तेंडोली येथे बिबट्यास जीवदान

कुडाळ : तालुक्यातील तेंडोली-कुंभारवाडी येथे शुक्रवारी रात्री कुत्र्याला पकडण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या दोन वर्षीय मादी बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
शुक्रवारी रात्री भक्ष्याच्या शोधात बिबट्या तेंडोली येथील कुंभारवाडीमध्ये आला. याचवेळी तेथे एक कुत्रा फिरताना दिसला. त्याने त्या कुत्र्याचा पाठलाग सुरू केला. बिबट्याला पाहून कुत्रा धावत असताना तेथीलच सगुण तेंडोलकर यांच्या घराशेजारील कठडा नसलेल्या विहिरीत कुत्रा पडला. कुत्र्याच्या मागोमाग धावणारा बिबट्या त्या विहिरीत पडला. (पान ८वर) विहिरीत पाण्याची पातळी कमी होती. त्यामुळे बिबट्या व कुत्रा हे दोघेही सकाळपर्यंत जिवंत राहिले.
विहिरीत पडल्यामुळे व बिबट्यासमोर असल्याने कुत्रा जोरजोरात भुंकत होता. त्यामुळे विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती तेथील ग्रामस्थांना मिळाली. त्यांनी ती वनविभागाला दिली. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने मोहीम सुरू केली. प्रथम कुत्र्याला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अथक परिश्रमाने बिबट्याला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात कैद करण्यात आले. कमी वेळात सुयोग्य नियोजनाने ही मोहीम राबविण्यात आली.
या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचे कुडाळ वनक्षेत्रपाल संजय कदम, मठ वनपाल वि. अ. मसुरकर, नेरूर वनपाल कृष्णा कदम, वनरक्षक तानाजी दळवी, सुरेश मेथर, सावळा कांबळे, हरी राठोड, किशोर परुळेकर, लक्ष्मण आगलावे, गुरुनाथ मयेकर यांच्याबरोबर तेंडोलीतील काही ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, कुडाळमध्ये या बिबट्याला आणल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. हा बिबट्या मादी असल्याचे सांगून प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. पकडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नैसर्गिक अधिवासात सोडले. (प्रतिनिधी)

 

Web Title: Tibetan survival at Tendoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.