रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ
By Admin | Updated: September 29, 2015 23:53 IST2015-09-29T23:23:39+5:302015-09-29T23:53:18+5:30
रात्रीत १२ दुकाने फोडली : जिल्हाभरात चोरट्यांचा वावर ?

रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ
रत्नागिरी : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी रत्नागिरी शहरासह जिल्हाभरात गेल्या आठवडाभरात धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बेकरी, बार, रुग्णालयासह १२ दुकाने चोरट्यांनी रविवारी रात्री फोडल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. या चोरीमध्ये अल्प रक्कम चोरीस गेली असली तरी दुकाने फोडण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
चोरट्यांचे मोठे टोळके जिल्ह्यात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती चोरट्यांकडूनच नागरिकांना देण्यात येत असून धमकावले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे अनेक गावांतील ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. गावात कोणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास अशा लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे प्रकारही घडले आहेत. रत्नागिरी बाजारपेठेतील शिवकृपा बेकर्स, राज इलेक्ट्रॉनिक्स, उज्वला वॉच, रत्नागिरी गादी कारखाना, जागृती ट्रान्स्पोर्ट, मुकुंद कृपा बार, पांचाळ सायकल मार्ट ही सात दुकाने फोडल्याची तक्रार संबंधित मालकांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या सर्व दुकानांमध्ये मिळून रुपये २४७० रुपयांचे साहित्य व रोख रकमेची चोरी झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या ७ दुकानांशिवाय आणखी ५ व्यावसायिक दुकाने, रुग्णालय, कार्यालये चोरट्यांनी फोडली. त्यातूनही काही वस्तू व ऐवज लंपास झाला आहे. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणीही केली; परंतु संबंधितांनी चोरीची तक्रार दिलेली नाही, असे सांगण्यात आले.
चोरट्याने मुकुुंद कृपा बारच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडले व आत प्रवेश केला. आतील बीअरच्या बाटल्या तसेच कॅश काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील काही रोख रक्कमही त्याने लंपास केली. या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने चोरटा या फुटेजमध्ये दिसला आहे. तो वयस्कर असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ
रत्नागिरी गादी कारखान्यातही चोरट्यांनी कॅश काऊंटरचा ड्रॉव्हर फोडून आतील चिल्लर व काही रोख रक्कम लंपास केली. मुख्य पोस्ट नाक्यापासून जवळच असलेल्या एका रुग्णालयाच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे स्पष्ट झाले.
काही ठिकाणी घडलेल्या घटनांची चर्चा जिल्हाभर होत असतानाच त्यातून नाहक अफवा पसरविण्याचे प्रकारही काहीजणांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील एका गावात एका घरात रंगकाम करण्यासाठी आलो आहोत, असे सांगणाऱ्या दोघांना घरच्यांनी घरातच कोंडले व गाव जमा झाला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु ते चोरटे नव्हते तर खरोखरच पेंटर होते, असे समोर आल्याची खुमासदार चर्चाही सुरू आहे. (प्रतिनिधी)
भय इथले संपत नाही...
लांजा तालुक्यातील पुनस, कुवे व रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी या गावांत गेल्या आठवडाभरापासून रात्रीच्यावेळी घरांच्या दरवाजावर बाहेरून टकटक करणे, घरावर दगड मारणे, घराजवळ विचित्र आवाज काढणे असे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
हरचेरी मलुष्टेवाडी व मुस्लिमवाडी येथे गेल्या आठवडाभरात हे प्रकार सातत्याने घडत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या गावात ग्रामस्थांनी पहारा ठेवला आहे. हे प्रकार कोण करतेय त्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ग्रामस्थांनीच मोहीम सुरू केली आहे.