खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक
By Admin | Updated: April 18, 2015 00:02 IST2015-04-17T23:33:02+5:302015-04-18T00:02:16+5:30
प्रेमप्रकरणातून खून झाल्याच्या संशयाला पुष्टी

खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक
रत्नागिरी : शहरातील हिंदू कॉलनीत भरदुपारी झालेल्या खून प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत रूपेश चंद्रकांत बिर्जे (वय २२, कुरतडे, पालवकरवाडी), अजित यशवंत तळेकर (२२, कुरतडे) सिद्धेश प्रमोद घाग (२४, शांतीनगर, नाचणे) या तिघांना अटक केली. न्यायालयाने शुक्रवारी त्यांना २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. खून झाल्यानंतर दहा तासांतच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.या खून प्रकरणात हल्लेखोरांनी वापरलेली नॅनो कार पोलिसांनी जप्त केली असून, अजून तीन ते चार अनोळखी आरोपी व दोन दुचाकी यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा तपास आता शहर पोलिसांकडून उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रेम त्रिकोणातून हे प्रकरण घडल्याचे पुढे आले आहे. मृत विनायक घाडी याचे व एका तरुणीचे प्रेमसंबंध होते. त्या तरुणीचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. विनायक याच्यावर आपले प्रेम होत,े तर रूपेश बिर्जे याला आपण मित्र मानत होते, असे संबंधित तरुणीने जबाबात म्हटले आहे. त्यामुळे रूपेश बिर्जे तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता, असे तपासात पुढे आले आहे. विनायकवर त्या तरुणीचे प्रेम असल्याचा राग मनात धरूनच विनायकचा काटा काढल्याचा संशय आहे.
मोबाईल उकलणार खुनाचे गूढ
या प्रकरणातील संबंधित तरुणीचा मोबाईल हॅँडसेट, मृत विनायक घाडीचे दोन मोबाईल हॅँडसेट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेतील आरोपी रूपेश बिर्जे, सिद्धेश घाग व नितीन तळेकर यांचेही मोबाईल हॅँडसेट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे फोन कंपन्यांकडून या सीमवरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणात नेमके काय घडले, हे स्पष्ट होणार आहे.
वार करणाऱ्याचा शोध सुरू
प्रथम अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आलेल्या तरुणांची विनायकशी झटापट झाली. मात्र, त्यानंतर आलेल्या तरुणाने हत्याराचे वार केल्याचे तपासात पुढे येत आहे. त्यामुळे त्या आरोपीचा पोलीस शोध घेत असून, त्याला लवकरच अटक होईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.