वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. विजय पैठणे आणि त्यांच्या दोन विद्यार्थिनींनी ‘चिकट मत्स्याक्षी’, ‘भुईचाफा’, ‘गाठी तुळस’ (रान तुळस) अशा तीन दुर्मीळ वनस्पती शोधून त्यांची वनस्पती संशोधन संस्थांकडे नोंद केली आहे. २५ वर्षांनंतर या वनस्पती आढळून आल्याने जिल्ह्याच्या वनसंपदेत मोठी भर पडली आहे.नैसर्गिक साधनसंपन्न असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत १२००हून अधिक वनस्पतींची नोंद झालेली आहे. आता त्यामध्ये नव्याने तीन दुर्मीळ वनस्पतीची भर पडणार आहे. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय पैठणे तसेच महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनी सारिका बाणे व योगेश्री केळकर यांनी भुईचाफा चिकट मत्स्याक्षी आणि ‘गाठी तुळस’ (रान तुळस) या तीन दुर्मीळ वनस्पती शोधल्या आहेत. २०१५ पासून विविध वनस्पतींचा शोध, त्याची चिकित्सा सुरू होती. त्यातून या तीन वनस्पतीचा शोध लागला आहे.
शिवडाव येथे भुईचाफाभुईचाफा ही वनस्पती सारिका बाणे या विद्यार्थिनीला कणकवली तालुक्यातील शिवडाव येथे दिसून आली. २५ वर्षांनंतर ही वनस्पती कोकणात आढळून आल्याचा दावा केला आहे. भारतात या प्रजातीचे ८ प्रकार आढळतात. महाराष्ट्रात या वनस्पतीचा आधी फक्त पुणे परिसरात उल्लेख होता.
‘चिकट मत्स्याक्षी’ आढळली
योगेश्री केळकर हिला ‘चिकट मत्स्याक्षी’ ही वनस्पती आढळून आली. नावीन्यपूर्ण आणि दुर्मीळ वनस्पती दिसून आल्याने तिने ती पैठणे यांच्या निदर्शनास आणून दिली. राज्यात आधी या वनस्पतीची नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतात या प्रजातीच्या १४ प्रकारांपैकी दोन फक्त महाराष्ट्रात होत्या. ही वनस्पती पूर्वी बिहार, केरळ, ओरिसा, उत्तर प्रदेश या राज्यांत होती. आता महाराष्ट्रातही हिची भर पडली आहे.
गाठी तुळसची महाराष्ट्रात प्रथमच नोंद‘गाठी तुळस’ ही वनस्पती अर्थात रानतुळस ही कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे पैठणे यांना आढळली. पूर्वी या वनस्पतीची नोंद फक्त अंदमान-निकोबार, केरळ, त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि गोवा (मोलेम नॅशनल पार्क) येथे होती. महाराष्ट्राच्या वनसंपदेत या प्रजातीची ही पहिली नोंद ठरली आहे.
या तिन्ही वनस्पतींचे शुष्क नमुने आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या ‘हर्बेरियम’मध्ये ठेवलेले आहेत. यामुळे भविष्यात अभ्यासकांना या दुर्मीळ वनस्पती थेट पाहता येणार आहेत.