तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार
By Admin | Updated: October 17, 2014 00:38 IST2014-10-17T00:13:14+5:302014-10-17T00:38:45+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभाग : स्वच्छ भारत अभियान

तीन प्राथमिक शाळा देशात चमकणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन शाळा स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर चमकणार आहेत़ त्या शाळांचे चित्रीकरण करुन त्यांचा अहवाल सादर करण्याची सूचना केंद्र शासनाकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाला देण्यात आली आहे. केंद्र शासनाकडून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे़ हे अभियान सर्व ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालये, शासकीय,निमशासकीय कार्यालये, बसस्थानके, रेल्वे स्थानक, प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा या अभियानामध्ये समावेश करण्यात आला आहे़ आतापर्यंत रत्नागिरी जिल्हा परिषदेने सर्व शिक्षा अभियानामध्ये तसेच शैक्षणिक दर्जाबाबत राज्यामध्ये नाव कमावलेले आहे. त्यानंतर आता या स्वच्छता अभियानामध्ये जिल्हा परिषदेला नाव कमावण्याची संधी मिळणार आहे.
या स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्वच शाळा जोरदारपणे राबवत आहेत़ जिल्ह्यात स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडून पाहणी करण्यात येणार आहे़ तसेच अशा शाळांचे चित्रीकरण करण्यात येणार आहे़ याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला सादर करण्यात येणार आहे़ या अभियानामध्ये चांगले काम करणाऱ्या शाळांची निवड शिक्षक विभागाने केली आहे़ त्यामध्ये लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ आणि संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर शाळा क्रमांक १, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सायले या शाळांचा समावेश आहे़ या शाळांचे चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे, त्याबाबतची तयारी करण्याची सूचना निवड करण्यात आलेल्या तिन्ही शाळांना देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश जोशी यांनी दिली. निवड करण्यात आलेल्या शाळा देशात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (शहर वार्ताहर)
लांजा क्रमाक ५, पूर शाळा क्ऱ १, सायले.
नोव्हेंबरमध्ये चित्रिकरण होणार.
स्वच्छ भारत अभियान.
जिल्ह्यातील सर्व शाळांचा अभियानामध्ये सहभाग.
केंद्र शासनाला अहवाल सादर होणार.