दुचाकीच्या डिकीतून तीन लाखांची चोरी
By Admin | Updated: September 12, 2014 23:30 IST2014-09-12T23:27:07+5:302014-09-12T23:30:47+5:30
बाजारपेठेतील प्रकार : मुलाच्या शिक्षणासाठी जमीन, घर विकून उभे केलेले पैसे

दुचाकीच्या डिकीतून तीन लाखांची चोरी
खेड : दुचाकीच्या डिकीत ठेवलेले ३ लाख रुपये चोरीस गेल्याची घटना आज, शुक्रवारी दुपारी खेडच्या भरबाजारपेठेत घडली आहे. याप्रकरणी त्यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बी. जी. धुमाळ यांनी नाकाबंदी केली होती. हे पैसे त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी जमीन आणि घर विकून उभे केले होते.
शहरानजीकच्या भरणे समर्थनगर येथे राहणारे यल्लाप्पा पवार हे ठेकेदार आहेत. आपला मुलगा मारुती (२२) याच्या उच्च शिक्षणासाठी पैसे कमी पडले म्हणून त्यांनी आपले घर आणि जमीन विकून जमविलेले ३ लाख रुपये खेड येथील बँक आॅफ इंडियामध्ये ठेवले होते. ते काढण्यासाठी शुक्रवारी ते बँकेत गेले. बँकेतून त्यांनी हे पैसे काढले. त्यावेळी त्यांचा मुलगा सोबत होता. हे पैसे पवार यांनी आपल्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवले आणि मुलग्याला घेऊन ते घरी जाण्यास निघाले होते.
वाटेत शहरातील वाणीपेठ परिसरात असलेल्या एका कापड दुकानासमोर आपली गाडी उभी केली आणि खरेदीसाठी ते दुकानात गेले. मात्र, दुकानातून परत गाडीजवळ आले तेव्हा गाडीच्या डिकीचे कुलूप तोडण्यात आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आतील पैसे गायब झाल्याचे दिसल्यानंतर ते अक्षरश: हादरले. त्यांनी तेथे याबाबत चौकशीही केली. मात्र, याचा काही उपयोग झाला नाही.
त्यांनी थेट पोलीस स्थानक गाठले. घडला सारा प्रकार कथन केल्यानंतर लागलीच पोलीस उपनिरीक्षक धुमाळ यांनी आपली तपासाची चक्रे फिरवली. लवकरच आरोपी गजाआड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)