कासार्डे पथकाचा थरार
By Admin | Updated: September 8, 2015 22:51 IST2015-09-08T22:51:17+5:302015-09-08T22:51:17+5:30
६६ हजारांची दहीहंडी : प्रमोद जठार मित्रमंडळाचे आयोजन

कासार्डे पथकाचा थरार
नांदगांव : गो...गो...गो...गोविंदा म्हणत ‘आला रे आला’चा जयघोष करीत डी. जे. व आॅर्केस्ट्राच्या तालावर बेधुंद होत थर रचण्याची कसरत करत हजारोंच्या उपस्थितीत व जल्लोषी वातावरणात कासार्डे येथील माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाची ६६ हजार ६६६ ची दहीहंडी पाच थर लावत म्हाडकादेवी गोविंदा पथक कासार्डे यांनी फोडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आकर्षक कोकण दूध चषक देऊन गोविंदा पथकाला गौरविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी या उत्सवाचा आनंद लुटला.सलग सहाव्या वर्षी माजी आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्यावतीने कासार्डे तिठा येथे मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कासार्डे येथील मान्यवर मंडळींच्या हस्ते सायंकाळी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. ही दहीहंडी फोडण्यासाठी ब्राह्मणदेव गोविंदा पथक गोवळ तांबेवाडी, मूळ महापुरुष मित्रमंडळ तिवरे वाळवेवाडी, हनुमान प्रसन्न राजापूर, कोळंबा गोविंदा पथक नांदगाव, गुरववाडी गोेविंदा पथक राजापूर, आर. के. जी. साळिस्ते, खारेपाटण, पावणादेवी सोनाळी, गुरववाडी खारेपाटण, कुलस्वामिनी कोळोळी या गोविंदा पथकांनी हजेरी लावत थराची सलामी दिली. यावेळी सलामी देणाऱ्या प्रत्येक संघास रोख रक्कम व कोकणे दूध सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डी. जे. व आॅर्केस्ट्राच्या तालावर गोविंदा पथकाबरोबर रसिक प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला.
यावेळी या दहीहंडी उत्सवास माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हा सरचिटणीस जयदेव कदम, प्रमोद रावराणे, राजन चिके, कणकवली तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष सुहास सावंत, डामरे सरपंच बबलू सावंत, भाजप युवा मोर्चा प्रदेश सदस्य संजय नकाशे, युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष मयूर चव्हाण, अमोल लोके, प्रभाकर सरवणकर, नीळकंठ पाटील, उपसरपंच अशोक पांचाळ, सहदेव खाडये, संदीप बांदिवडेकर, नीलेश पारधिये, संजय कुदळे, किशोर जठार यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रात्री १०
वाजता गर्दीने उच्चांक गाठला होता. याचवेळी कासार्डे येथील म्हाडकादेवी गोविंदा पथकाने पाच थरांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करीत यावर्षीची दहीहंडी फोडत कोकण दूध चषकावर आपले नाव कोरले
व दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला.
यावेळी कासार्डे आरोग्य केंद्राचे पथक, पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदक म्हणून राजा सामंत व तळेरेतील राजू माळवदे यांनी काम पाहिले. (वार्ताहर)
दुष्काळग्रस्तांना मदत
आमदार प्रमोद जठार मित्रमंडळातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून यावर्षीची रोख रक्कम ६६,६६६ रुपये व संजय नकाशे मित्रमंडळाची उर्वरित रक्कम, असे एक लाख रुपये दुष्काळग्रस्तांना देण्यात येतील, असे घोषित करण्यात आले. यामुळे खऱ्या अर्थाने सामाजिक कार्याची हंडी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी बांधण्याचे फलितार्थ ठरले.