दाभोळ खाडीत हजारो मासे मृत
By Admin | Updated: September 16, 2014 23:22 IST2014-09-16T22:03:39+5:302014-09-16T23:22:07+5:30
सांडपाण्याचा विळखा : लोटेतील रसायनमिश्रित पाण्याने घेतला जीव

दाभोळ खाडीत हजारो मासे मृत
दापोली : लोटे एमआयडीसीचे रसायनमिश्रीत दूषित पाणी दाभोळ खाडीत सोडल्याने दापोली खाडीतील हजारो मासे मृत्यू पावले असून, या किनाऱ्यावर माशांचा खच पडला आहे. दाभोळ खाडीत मासे मेल्याने या खाडीतील मच्छिमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे.
दाभोळ खाडीपट्ट्यातील ४५ गावातील भोई, कोळी, खारवी, दालबी समाज पारंपरिक पद्धतीने मासेमारी करतो. मात्र, गेल्या काही वर्षांपासून लोटे औद्योगिक कारखान्याचे रसायनमिश्रीत दूषित पाणी थेट खाडीत सोडले जात असल्याने खाडीतील मासे दरवर्षी मरु लागले आहेत.
वारंवार दूषित पाणी सोडल्याने खाडीपट्ट्यातील चवदार मासे नामशेष झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या जातीही नष्ट झाल्या आहेत. माशाचे उत्पादन वाढत नसल्याने व सर्वच मासे केमिकलमुळे मरु लागल्याने दाभोळ खाडीतील माशांच्या जाती नामशेष होऊन या पट्ट्यातील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. खाडीपट्ट्यातील ४५ हजार मच्छिमार समाजाचा उदरनिर्वाह या खाडीवर होत होता. मात्र, अलीकडे मासे मिळत नसल्याने त्यांचा पारंपरिक व्यवसाय नष्ट झाला आहे. लोटे औद्योगिक वसाहतीमुळे अनेक कुटुंब विस्थापित झाली आहेत.
दापोली खाडीत लोटे एमआयडीसीचे दूषित पाणी सोडल्यामुळे किनारपट्टीवर विविध प्रकारचे लाखो मासे मरुन पडले आहेत. किनारपट्टीवर माशांचा खच पडल्याने या भागात दुर्गंधी पसरुन मानवाच्या जीवितास धोका निर्माण होण्यची शक्यता आहे. चिपळूण, गुहागर, दापोली या तीन तालुक्यातील दाभोळ खाडीमुळे अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहाची संधी मिळत होती. परंतु या भागातील मासेमारी व्यवसाय अडचणीत सापडल्याने त्यांचे जीवनच संघर्षमय बनले आहे.
लोटे औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांमधून वारंवार सांडपाण्याचा निचरा हा खाडीत केला जातो. मोठ्या प्रमाणावर रासायनिक पाणी या खाडीत सोडण्यात येते. त्याचा फटका केवळ दापोली तालुक्यातील खाडीलाच नव्हे; तर खेडमधील काही भागातील नद्यांनाही बसत आहे. पावसाळ्यापूर्वी खेड तालुक्यातील एका नदीकिनारी हजारो मासे मृत झाले होते. त्यावेळेस प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, अशावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ संबंधित कंपन्यांविरूध्द कोणतीच कारवाई करत नसल्याने तसेच कंपन्यांना यावर उपाययोजना करण्यास सांगत नसल्याने वारंवार खाडीतील जलप्रदूषण वाढत आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.
आधीच मत्स्योत्पादन घटत असताना या कंपन्यांकडून होणाऱ्या प्रदूषणामुळे हे मत्स्योत्पादन आणखीन धोक्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
प्रदूषणाची समस्या ऐरणीवर...
लोटे येथील विविध रासायनिक कंपन्यांमधून होणाऱ्या जलप्रदूषणाचा मुद्दा वारंवार ऐरणीवर येत आहे. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून याबाबत ‘हाताची घडी अन् तोंडावर बोट’ असेच धोरण स्विकारले जात असल्याने त्याबाबत पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. अशा कंपन्यांविरूध्द कारवाईची मागणी होत आहे.
दाभोळ खाडीत वारंवार रसायनमिश्रीत पाणी सोडून दाभोळ खाडीतील मासे नष्ट करण्याचे काम लोटे औद्योगिक वसाहतीकडून होत असून, या भागातील मासे नष्ट झाले आहेत. त्यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान होत आहे. मच्छिमारांना मासे मिळेनासे झाले आहेत. सरकारने यावर लवकर तोडगा काढावा अन्यथा मच्छिमार बांधवांच्या हितासाठी संघर्ष करावा लागेल.
- उदय जावकर,
मच्छिमार नेते, दाभोळ