हजार शिक्षकांचे ओझे दोघांवर

By Admin | Updated: January 9, 2015 00:10 IST2015-01-08T23:27:26+5:302015-01-09T00:10:43+5:30

पंचायत समिती : रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी

A thousand teachers burden on both | हजार शिक्षकांचे ओझे दोघांवर

हजार शिक्षकांचे ओझे दोघांवर

रहिम दलाल - रत्नागिरी  -रत्नागिरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील १००० शिक्षकांच्या कामाचा संपूर्ण भार केवळ दोन क्लार्कवर आहे़ त्यामुळे या विभागातील दोन्ही कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे़
रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभागासाठी १००० शिक्षक पदे मंजूर असून, त्यापैकी ९५७ शिक्षक कार्यरत आहेत़ या १००० शिक्षकांच्या आस्थापनेसाठी ५ क्लार्कची पदे मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ दोन पदे भरण्यात आली आहेत़ उर्वरित तीन पदे रिक्त आहेत़ तसेच तालुक्यातील ६ बीटसाठी तेवढेच विस्तार अधिकारी मंजूर आहेत़ मात्र, त्यापैकी केवळ ४ विस्तार अधिकारी कार्यरत असून, दोन पदे रिक्त आहेत़
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविले जातात़ त्याचबरोबर शिक्षकांची पगार बिले काढणे, प्रॉव्हिडंड फंडाची कामे करणे, विविध शासकीय योजनांचे कामे व अन्य कामे त्या क्लार्कना करावी लागतात़ ही कामे करताना दोन्ही क्लार्कची दमछाक होत आहे.
तालुक्यामध्ये प्रत्येक माध्यमिक शाळेसाठी एका क्लार्कची नियुक्ती करण्यात येते़ मात्र, तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३४६ प्राथमिक शाळांसाठी केवळ २ क्लार्क कार्यरत आहेत. या दोन्ही क्लार्कना दररोज सायंकाळी उशिरापर्यंत थांबून काम करावे लागते़ विस्तार अधिकाऱ्यांची २ पदे रिक्त आहेत़ विस्तार अधिकाऱ्यांना शाळांना भेटी द्यावा लागतात़ कार्यरत असलेल्या ४ अधिकाऱ्यांवर तालुक्याचा भार असल्याने तेही हैराण झाले आहेत़
विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येतो़ त्या पोषण आहाराच्या कामकाजासाठी अधीक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली आहे़ मात्र, हेही पद रिक्त असल्याने अधीक्षकाचे कामही या दोन्ही क्लार्कना करावे लागते.
तालुक्यातील १००० शिक्षकांचा भार केवळ दोन क्लार्कवर मदार असल्याने त्यांची दमछाक होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत शिक्षक़वर्गातून व्यक्त होत आहे.
रिक्त असलेल्या पदांमुळे पंचायत समितीचा शिक्षण विभाग मेटाकुटीला आला आहे़ ही रिक्त पदे भरण्याबाबत पंचायत समितीकडून जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अनेकदा मागणी करण्यात आली आहे़ (शहर वार्ताहर)

रोखपाल नियुक्त मात्र...
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सर्वशिक्षा अभियान राबविण्यात येत आहे़ त्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात रोखपालची नियुक्त करण्यात आली आहे़ मात्र, या पदावरील रोखपाल गेले सहा महिने रजेवर आहेत़ या रोखपालाच्या कामांचा भारही या दोन क्लार्कना उचलावा लागत आहे़ हे चित्र बदलणार कधी?

Web Title: A thousand teachers burden on both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.