गुन्हे दाखल झाले तरी पर्ससीनविरोधात लढणार
By Admin | Updated: November 28, 2014 00:08 IST2014-11-27T22:35:15+5:302014-11-28T00:08:32+5:30
दांडी चौकचार मंदिरातील बैठकीत पारंपरिक मच्छिमारांचा इशारा

गुन्हे दाखल झाले तरी पर्ससीनविरोधात लढणार
मालवण : येथील पारंपरिक मच्छिमारांनी अनधिकृत पर्ससीन मासेमारीविरोधात लढा उभारलेला आहे. हा लढा तीव्र आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या भविष्याचा आणि हिताचा विचार करता आम्हाला आप्तस्वकियांशी लढण्याची वेळ आली तरी आम्ही मागे हटणार नाही. पर्ससीनविरोधात लढताना आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरीही याची आम्ही तयारी ठेवली आहे. यापुढे अतिक्रमण करून पारंपरिक मच्छिमारांच्या तोंडचा घास हिरावून नेल्यास कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही, असा इशारा पकडण्यात आलेल्या मिनी पर्ससीननेटच्या मालकांना देण्यात आला.
बुधवारी सायंकाळी देवबाग समुद्रकिनारी अवघ्या पाच वाव अंतरात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या दोन मिनी पर्ससीननेट नौकांना स्थानिक मच्छिमारांनी पकडून किनाऱ्यावर आणले होते. पकडण्यात आलेल्या दोन्ही मिनी पर्ससीननेटधारक नौकांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरूवारी दांडी चौकचार मंदिर येथे ग्रामस्थ मच्छिमारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित मिनी पर्ससीन नौका मालकांना बोलावून इशारावजा समज देण्यात आली.
यावेळी बैठकीचे अध्यक्ष छोटू सावजी, नॅशनल फीश वर्कर फोरमचे रविकिरण तोरसकर, जिल्हा श्रमजीवी मच्छिमार संघटनेचे सचिव दिलीप घारे, रूपेश प्रभू, नारायण धुरी, सन्मेश प्रभू, लिलाधर पराडकर, अन्वय प्रभू, बाबू जोशी, कल्पेश रोगे, मिथून मालंडकर, भाऊ मोर्जे, आबा वाघ, रश्मिन रोगे यांच्यासह अन्य उपस्थित होते.
आम्ही लढत असलेला लढा स्वत:च्या फायद्यासाठी नसून संपूर्ण किनारपट्टीवरील लहान मच्छिमारांच्या हितासाठी आहे. यामुळे या लढ्यात आमच्याविरोधात कोण आहे? याचा आम्ही विचार करणार नाही. महाभारतातल्या अर्जुनासारखी आमची स्थिती असली तरीही आम्ही हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याचे घारे म्हणाले.
विकी तोरसकर म्हणाले, पर्ससीन बंदीला स्थगिती मिळावी व नव्याने परवाने मिळावेत, यासाठी काही पर्ससीन मालकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लढा प्रभावीपणे उभारण्यासाठी निधी संकलनाबरोबर राजकीय दबाव निर्माण करण्याची गरज आहे. यावेळी आपल्याकडून चूक झाल्याचे पर्ससीन नौका मालक केळुसकर यांनी कबूल केले.
यापुढे पुन्हा अतिक्रमण झाले तर माझ्यावर अवश्य दंडात्मक कारवाई करा, असे ते म्हणाले. बैठकीदरम्यान मच्छिमारांच्या भावना तीव्र होत्या. आम्हीसुद्धा पर्ससीन घेऊ शकतो. मात्र उद्या मत्स्य साठे संपल्यावर दुसऱ्यांच्या घरी पाणी भरण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही लढत असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अर्जुनासारखी स्थिती
दिलीप घारे म्हणाले, अनधिकृत मासेमारीविरोधात न्यायालयात याचिका सुरू आहे. स्थानिक पातळीवर मिनी पर्ससीनविरोधात वेगळ््या पद्धतीने लढा सुरू ठेवला आहे. पारंपरिक मच्छिमारांच्या हितासाठी आम्ही लढत असताना शासकीय पातळीवर अद्याप यश आले नाही. असे असतानाही किनाऱ्यालगत येऊन काही पर्ससीन नौका अतिक्रमण करीत आहेत. यामध्ये काही आमचेच आप्तस्वकीय आहेत.