नियम मोडणाऱ्यांचे ‘वाजले की बारा...’!
By Admin | Updated: November 28, 2014 23:52 IST2014-11-28T22:16:53+5:302014-11-28T23:52:56+5:30
वाहतूक नियंत्रण : दहा महिन्यात वाहतूक नियंत्रण पोलिसांनी वसूल केला १२ लाखांचा दंड

नियम मोडणाऱ्यांचे ‘वाजले की बारा...’!
प्रकाश वराडकर -रत्नागिरी -काही खास लोकांसाठी वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, दुचाकीवरून तीन सीट घेऊन प्रवास करणे, सिग्नलचे उल्लंघन करणे व भरधाव वेगाने वाहने चालविणे हे जणू भूषण ठरत आहे. या चार गोष्टींचे ‘चार चॉँद’ लावले गेल्यानेच त्यांचे ‘वाजले की बारा...’ अशी स्थिती झाली आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या १६ पराक्रमांसाठी (?) पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेने या भूषणवीरांकडून जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१४ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ११ लाख ९२ हजार ५५० रुपये दंड वसूल केला आहे.
रत्नागिरी वाहतूक पोलीस शाखेने गेल्या दहा महिन्यांच्या काळात वाहतूक नियमनासाठी ज्या मोहिमा राबविल्या व नियमित स्वरुपात वाहनांची जी तपासणी केली त्यामध्ये वाहनचालकांकडून १६ प्रकारच्या नियमभंगासाठी दंड वसूल केला आहे. ही १६ विविध कारणे असली तरी त्यातील भरधाव वेगाने (धूम स्टाईल) गाडी हाकणे, गाडी चालवताना मोबाइलवर बोलणे, सिग्नलचे उल्लंघन करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनात घेणे यासारख्या मुख्य कारणांमुळेच अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
अवैध प्रवासी वाहतूक, रहदारीस अडथळा, कागदपत्र जवळ नसणे, चालक परवाना नसणे, रहदारीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दुचाकीवर तिघांनी बसून प्रवास करणे, वाहन भरधाव चालविणे, वाहनात, रिक्षात क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, नो पार्किंगमध्ये वाहन ठेवणे, वाहनांवर नंबर प्लेट नसणे, सिग्नल तोडणे, गणवेश नसणे यासारख्या १६ कारणांसाठी वाहतूक पोलिसांनी जिल्हाभरात दहा महिन्यात ९८६४ जणांना दंड ठोठावला.
वाहनांची संख्या वाढत असताना वयाची १८वर्षे पूर्ण न केलेल्या मुलांनाही पालक दुचाकी घेऊन देतात. त्यांना परवाना मिळू शकत नाही. त्यातील अनेक मुले विनापरवाना गाडी चालवितात. (प्रतिनिधी)
आॅक्टोबर २०१४अखेरची कारवाई
अ.नं.प्रकार एकूण
केसेसतडजोड शुल्क/दंड
१अवैध प्रवासी वाहतूक७८१,०५,०५०
२रहदारीस अडथळा९६६१,००,७००
३कागदपत्र जवळ न बाळगणे१,०३९१,०९,३००
४लायसन जवळ न बाळगणे१,००५१,०६,७००
५रहदारीचे विरुद्ध९९४१,०२,५००
६दुचाकीवर तीन सिट१,१५३१,१३,१००
७फ्रन्ट सीट२३५२४,७००
८भरधाव वेगाने वाहन चालविणे६६२८,०५०
९क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी५५६,२००
१०वाहन चालविताना मोबाईल संभाषण करणे५१७५२,७००
११नो पार्किं गमध्ये वाहन चालविणे३८४,०००
१२फाळक्याचे बाहेर माल२७४२७,८००
१३वाहनावर नंबर प्लेट नसणे४५१४५,७००
१४सिग्नलचे उल्लंघन करणे१,६१०१,६७,३००
१५गणवेश परिधान न करणे३१३,३००
१६इतर केसेस१,३५२१,९५,४५०
एकूण केसेस९,८६४११,९२,५५०
वाहन चालविताना मोबाईल धोकादायक
शहरात दुचाकी चालविताना एका हातात कानाला लावलेला मोबाईल व दुसऱ्या हाताने दुचाकी चालविणे असे प्रकार वाढले आहेत. हाच प्रकार चारचाकी चालविणाऱ्यांबाबतही सुरू आहे. त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रतिष्ठित म्हणविणाऱ्यांकडूनच याप्रकारे नियमांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण जास्त आहे. पोलिसांनी अडविलेच तर दंड भरण्यास ते जराही मागेपुढे पाहत नाही. त्यांच्यासाठी वाहतूक नियम मोडणे हेच जणू प्रतिष्ठेचे बनले आहे की काय, असा संशय घेण्याजोगी स्थिती आहे. त्यामुळे अशा प्रतिष्ठितांनाही वाहतूक कायद्याचा बडगा हा दाखविलाच पाहिजे.
वेगाचे फॅड जीवघेणे...
अलिकडे तरुणाईत वेगाचे वारे भलतेच भरले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या स्पोर्टस दुचाकी अशा काही वेगाने पळतात की धूम स्टाईलही फिकी पडावी. त्यांना केवळ वेगाची फिकीर असते. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांच्या जिविताची फिकिर नसते. आपल्या वेगामुळे दुसऱ्याचे आयुष्य, जीव धोक्यात येईल. त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंबिय पोरके होतील हे त्यांच्या गावीही नसते. त्यामुळे हे वेगाचे वारे रोखण्यासाठी, वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे..