‘त्या’ अज्ञातांची लांजा शहरातही दहशत
By Admin | Updated: September 28, 2015 23:45 IST2015-09-28T21:55:37+5:302015-09-28T23:45:40+5:30
अनेक चर्चा : ग्रामस्थांची उडाली झोप, पोलिसांकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा

‘त्या’ अज्ञातांची लांजा शहरातही दहशत
लांजा : कुवे गावातील नवीन वसाहत गुरववाडी, मराठवाडी येथे गेली पंधरा दिवस अज्ञातांनी ग्रामस्थांची झोप उडवली असतानाच गेले दोन दिवस लांजा शहरातील वैभव वसाहत येथे देखील घराच्या अंगणात अज्ञात व्यक्ती दिसून आल्याने रविवारी रात्री येथील १०० युवकांनी शोध घेऊनही हे अज्ञात लोक त्यांच्या हाती न लागल्याने कुवे गावानंतर या अज्ञातांना आपला मोर्चा लांजा शहरात वळवला असल्याचे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेले पंधरा दिवस कुवे येथील महामार्गालगत असणारी नवीन वसाहत, मराठवाडी, गुरवववाडी येथील घरांच्या दरवाजांच्या कड्या वाजवणे, लहान मुलांचा रडण्याचा आवाज, महिलांचा किंचाहण्याचा अपावाज, शिट्या मारणे, घरावर दगड फेकणे, विविध प्राण्यांचे आवाज काढणे, महिलांचा पाठलाग करणे या विचित्र प्रकाराने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या प्रकाराचा शोध घेण्यासाठी कुवे गावातील १५ ते २० तरुणांची फळी रात्रभर या वाड्यांमध्ये गस्त घालत आहेत. हे लोक दिसल्यानंतर मोठ्याने किंचाळतात व क्षणार्धात येऊन पळ काढतात असे काही ग्रामस्थांनी सांगितले. कुवे येथील संतोष लाखण यांच्यावर या अज्ञाताने हल्ला करण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच शाळेतून घरी परतणाऱ्या शाळकरी मुलीचा पाठलाग देखील या अज्ञातानी केला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेने मोबाईलवर संभाषण करणाऱ्या व्यक्तीला पाहून या महिलेने येथून धुम ठोकली. मात्र, अर्ध्या कुवे गावातच हा प्रकार घडत असल्याने इतर वाड्यातील ग्रामस्थांना हा थट्टेचा विषयच बनला आहे. पण ज्या लोकांनी स्वत: अनुभवला आहे त्यांनी मात्र हातात लाठ्या-काठ्या घेऊन रात्रीचा जागता पहारा ठेवला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी लांजा पोलिसांना निवेदन देखील दिले आहे.
कुवे येथील रात्रौ गावात गस्त घालत असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांना दिसून आली. त्याला विचारणा केली मात्र त्याला मराठी भाषा येत नसल्याने मोठी गोची झाली. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ संशय येण्यासारख्या वस्तू सापडल्याने त्याला लांजा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो आपले नाव दिलीप पुनीराम चव्हाण (२३, भास्करा, जि. रायपूर) येथून आल्याचे सांगतो. मात्र, रत्नागिरीहून चालत येथे पोहोचल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच रविवारी दुपारी लांजा बौद्धवाडी येथे एका संशयिताला पकडून ताब्यात देण्यात आले होते. कुवे गावानंतर सध्या लांजातील वैभव वसाहत येथे दरवाजाच्या कड्या वाजवण्याचा प्रकार झाला. (प्रतिनिधी)
रविवारी रात्री ११ वा. दरम्याने वैभव वसाहत येथील महिला घराच्या मागच्या बाजूला जेवण आटोपून भांडी घासण्यासाठी गेली असता त्यांच्या घराच्या मागील बांधावरुन अज्ञाताने उड्या मारुन पोबारा करत असल्याचे पाहिले होते. तिने ओरड केल्यानंतर वैभव वसाहत येथील तरुणांनी एकत्र येऊन शोध घेतला मात्र आडाच्या दिशेने जंगलात गेले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.