निष्पाप मुले झाली पोरकी
By Admin | Updated: October 30, 2015 22:37 IST2015-10-30T22:37:02+5:302015-10-30T22:37:02+5:30
मृत कोकरेच्या मुलांना हवाय आधार : वयोवृद्ध आजी-आजोबांचे मदतीचे आवाहन

निष्पाप मुले झाली पोरकी
वेंगुर्ले : आरवली-टांक-नाबरवाडी येथील आंबा बागेत काम करणाऱ्या मठ कोल्ह्याचे भाट येथील धाऊ रामा कोकरे याचा खून त्याची पत्नी व प्रियकराने केला; परंतु या घटनेनंतर त्यांना असलेल्या दोन्ही मुलांचा आधार नियतीने हिरावून घेतला. त्यांचे वृद्ध आजी- आजोबा हे पालनपोषण करण्यासाठी सक्षम नसल्याने या दोन्ही मुलांचा शिक्षणाचा व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, या दोन्ही मुलांना शासन, दानशूर संस्था व व्यक्ती यांनी आधार द्यावा, अशी मागणी त्यांचे आजी- आजोबा यांनी केली आहे.
अनैतिक संबंधातून मठ येथील धाऊ रामा कोकरे याचा खून पत्नी धनश्री कोकरे व तिचा प्रियकर शाम कासकरने केला. मठ कोल्ह्याचे भाट येथे धनगर समाजातील कोकरे व शिंदे ही दोन कुटुंबे वास्तव्यास आहेत. धाऊ कोकरे हा मोलमजुरी करून कुटुंब चालवित होता. तर त्यापूर्वी त्याचे वृद्ध आई-वडील रामा द्वारकानाथ कोकरे (वय ७०) व जनाबाई रामा
कोकरे (६५) हे कामधंदा करीत असत. रामा कोकरे हे मच्छी विक्रीचा व्यवसाय करीत; परंतु गेली दोन वर्षे त्यांच्या पायाच्या आजारामुळे ते घरीच असल्याने त्यांचा मुलगा धाऊ कोकरे हा कुटुंब चालवित होता. तर त्याचा दुसरा भाऊ धुळू कोकरे हा चिरेखाणीवर मोलमजुरी करतो.
तिसरा भाऊ सिदु कोकरे हा शिक्षण घेत आहे.
कोकरे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून, त्यांना स्वत:चे घरही नाही. धाऊ याचा खून झाल्याने व या खुनात त्याची पत्नी सहभागी असल्याने ती पोलिसांच्या ताब्यात आहे. धाऊचा नऊ वर्षांचा द्वारकानाथ हा मुलगा दुसरीमध्ये आरवली टांक सकाळवाडी येथील प्राथमिक शाळेत, तर पाच वर्षांचा लहान मुलगा लक्ष्मण हा बालवाडीत शिक्षण घेत आहे.
समाजातील कुटुंब व्यवस्थेला काळिमा फासणारी ही घटना अतिशय गंभीर व दु:खदायी आहे. मात्र, या चिमुरड्यांना शासनाने मदत करावी, असे आवाहन रामा व जनाबाई या आजी-आजोबांनी केली आहे. (वार्ताहर)
आजी-आजोबांची हाक
या दोन भावंडांचे वडिलांचे छत्र काळाने हिरावले, तर जन्मदात्री आईनेच परकेपणा करीत या चिमुरड्यांना पोरके केले आहे.
ही चिमुरडी मुले आजी-आजोबांच्या कुशीतच आपल्या आई-वडिलांचे छत्र शोधत आहेत; पण सांभाळासाठी ज्या आजी-आजोबाची कूस धरली आहे, तेही आता वयोवृद्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या मुलांच्या भविष्यासाठी शासनासह
समाजाला आर्त हाक देत त्यांच्या पालकत्वाचा भार पेलण्याचे आवाहन केले आहे.