आठवडा बाजारवर नियंत्रण नसल्याने संताप
By Admin | Updated: July 11, 2015 00:17 IST2015-07-10T22:29:41+5:302015-07-11T00:17:26+5:30
ग्राहकांना फटका : जैतापूरचा बाजार महाग, जाहीर झालेली समिती नियुक्तच नाही

आठवडा बाजारवर नियंत्रण नसल्याने संताप
जैतापूर : जैतापूर (ता. राजापूर) ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील आठवडा बाजारच महाग झाला आहे. विक्रेत्यांच्या दरावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
आठवडा बाजारामध्ये कोल्हापूर राधानगरी या भागातून येणारे व्यापारी अव्वाच्या सव्वा दराने भाजी विक्री करत आहेत. शेजारच्या नाटे गावामध्ये जैतापूरपेक्षा कमी दरात भाजी मिळत असल्याने जैतापूरवासीय नाटे गावातून भाजी विकत आणत आहेत.
जैतापूर आठवडा बाजाराच्या माध्यमातून जैतापूर ग्रामपंचायतीला वर्षाकाठी ७० हजार ते ७५ हजारापर्यंत महसूल मिळत आहे. विक्रेत्यांवर दरासंदर्भात जैतापूर ग्रामपंचायतीमध्ये समिती नेमण्याचे ठरले होते. ती समिती काम करते का? याबाबत लोकमतने जैतापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची भेट घेतली असता अद्याप समिती तयार केली नसल्याचे त्यांनी सांगितले. उपसरपंचांच्या दुकानासमोरच हा बाजार भरवण्यात येतो. जेव्हा लोकमतने या वृत्ताची दखल घेताच भाजी विक्रेत्यांनी पावकिलोच्या किमतीमध्ये सरासरी पाच रुपयांची घसरण केली. ही बाब उपसरपंचांच्या कानावर घालण्यात आली. येथे येणारे बहुतांश व्यापारी तपासणी न केलेल्या तराजूमध्ये मोजमाप करत असल्याने काटा मारणे, हा प्रकारदेखील होत आहे. पॅकिंग केलेली साखर, कडधान्य, चहापावडर, मसाले यांच्या वजनात घट असल्याचे ग्राहक सांगतात. परिणामी काही व्यापारी आपल्या किलोमागे दोन रुपये दर कमी केल्याचे सांगून ग्राहकांकडून सहानुभूती मिळवतात आणि त्यांची लूटही करतात. हा प्रकार येथील आठवडा बाजारात सर्रासपणे अनुभवास येतो. (वार्ताहर)