मासिक सभेत अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही
By Admin | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-10T22:36:41+5:302015-07-11T00:15:21+5:30
सदस्य संतापले : मालवण सभापती, उपसभापतींनी अधिकाऱ्यांकडून प्रश्न सोडवून घ्यावेत

मासिक सभेत अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही
मालवण : पंचायत समितीच्या बैठकीत वारंवार प्रश्न उपस्थित करूनही विकासाचे प्रश्न प्रलंबित राहतात. यावरुन पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्यात वारंवार खटके उडतात. जर मासिक सभांमध्ये प्रश्नच सुटत नसतील तर अधिकाऱ्यांची गरजच काय? असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी केला.
सदस्यांनी उपस्थित केलेले तालुक्यातील प्रश्न सभापती व उपसभापती यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सोडवून घ्यावे, अशी भूमिका पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी मांडली. अधिकारी हे सभेचा भाग आहे. त्यांना डावलून चालणार नाही असे सभापती सीमा परुळेकर यांनी सांगितले. तर गटविकास अधिकारी पराडकर यांनी सदस्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील. सभेनंतर पंधरवड्यात आढावा बैठकही घेतली जाईल असे सांगितले.
मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य प्रसाद मोरजकर, संजय ठाकूर, राजेंद्र प्रभुदेसाई, उदय दुखंडे, भाग्यता वायंगणकर,श्रद्धा केळुसकर, चित्रा दळवी, हिमाली अमरे आदी उपस्थित होते. दरम्यान ग्रामविकास अधिकारी पराग गुंजाटे यांना सभेच्या सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्ती देण्यात आलेले कणकवली आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शिकलगार १५ आॅगस्ट पूर्वी हजर न झाल्यास उपोषणास बसू असा इशारा उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी दिला. तर पालकमंत्री सावंतवाडी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली थांबवू शकतात तर मालवणातील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना सेवा, अधिकाऱ्यांची नियुक्ती गरजेनुसार झालीच पाहिजे असेही चिंदरकर यांनी सांगितले. यावर गटविकास अधिकारी पराडकर यांनी पंचायत समिती मासिक सभेत पदाधिकाऱ्यांनी इशारे देणे योग्य नाही अशी सूचना केली.
गोळवण डिकवल बौद्धवाडी येथील नळपाणी योजनेचा प्रश्न उपस्थित केला. संबंधित ग्रामपंचायतीने तत्काळ कोटेशन सादर करावे अशा सूचना उपसभापती चिंदरकर यांनी केल्या. मसुरे बेलाचीवाडी हा मार्ग खड्डेमय झाल्याने बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी संजय ठाकूर यांनी केली. तालुक्यातील वीज प्रश्न गंभीर बनला आहे. ग्रामस्थांनी आंदोलने करावी लागतात. तरी तालुक्यातील वीज प्रश्न सोडवण्यासाठी अधिकारी, ग्रामस्थांची बैठक व्हावी अशी मागणी उदय दुखंडे यांनी केली. तालुक्यातील शिरवंडे गाव हागणदारी मुक्त झालेला नाही यासाठी सदस्य व ग्रामपंचायतीने पुढाकार घावा. तसेच शौचालय बांधणीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शाळांना दिलेल्या संगणकांमुळे किती मुले साक्षर झालीत? त्याचा योग्य वापर होतो का ? असाही सवाल उदय दुखंडे यांनी उपस्थित केला. मच्छिमारावरील अन्यायाचा व पोलीस कारवाईची निषेध नोंदवण्यात आला आहे. (वार्ताहर)
अंगणवाड्यांत किती चिक्की, चटई, ताटे आली ?
महाराष्ट्रात अंगणवाड्यांत पुरवण्यात आलेली चिक्की, चटई व ताटे यांचा पुरवठा वादाच्या भोवऱ्यात असताना तालुक्यात किती चिक्की, चटई व ताटे अंगणवाडीतील मुलांसाठी आली याची विचारणा उपसभापती चिंदरकर यांनी केली. यावर एकात्मिक बालविकास अधिकारी श्रीराम शिरसाट यांनी अद्यापपर्यंत कोणताही पुरवठा झाला नसल्याचे सांगितले.