राणेंची तक्रार नसल्याने तपास नाही : काळे
By Admin | Updated: July 16, 2014 23:16 IST2014-07-16T23:12:41+5:302014-07-16T23:16:07+5:30
कोणतीही तक्रार नाही.

राणेंची तक्रार नसल्याने तपास नाही : काळे
सिंधुदुर्गनगरी : काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर झालेल्या दगडफेकीसंदर्भात त्यांनी आपल्याकडे कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा विषय येत नाही. तरीही कायदा व सुव्यवस्था विचारात घेता या संदर्भातील विचारपूस सुरु केली आहे, अशी माहिती ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काळे यांनी दिली.
नीतेश राणे कणकवलीहून मालवणच्या दिशेने जात असताना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास कसाल-मालवण रस्त्यावर रानबांबुळी नाका येथे त्यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली होती. यात एक किरकोळ जखमीही झाला होता. या संदर्भात बुधवारी पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात नीतेश राणे यांची कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले. दगडफेकीचा प्रकार घडल्यानंतर नीतेश राणे यांच्यासह कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, नीतेश राणे यांनी याबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब लिहून दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र कायदा व सुव्यवस्था ध्यानात घेता त्या परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून या संदर्भात विचारपूसही सुरु आहे.
नीतेश राणे यांनी याठिकाणी बोलताना दोन संशयितांची नावे घेतली होती. त्या संदर्भात संबंधित तालुक्यातील पोलीस निरीक्षकांना ‘त्या’ दृष्टीने लक्ष ठेवण्यास कळविण्यात आले असल्याचेही काळे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, नीतेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवरील दगडफेकीच्या वृत्तानंतर जिल्ह्यातील सुमारे २०० कार्यकर्ते ओरोस पोलीस ठाण्यात दाखल झाले होते आणि जोपर्यंत या प्रकरणातील संबंधितांना ताब्यात घेत नाहीत तोपर्यंत आपण इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली होती. मात्र, राणे यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केल्याने रात्री अकराच्या सुमारास हे सर्व कार्यकर्ते पोलीस ठाण्यातून निघून गेले. (प्रतिनिधी)