वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल

By Admin | Updated: July 16, 2014 23:16 IST2014-07-16T23:11:35+5:302014-07-16T23:16:19+5:30

दीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत

There is a need to work together for the destruction of bad habits | वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल

वाईट प्रवृत्तीच्या नाशासाठी एकत्रित काम करावे लागेल
दीपक केसरकर : शिवसेना प्रवेशाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात शिवसेनेकडून जंगी स्वागत
कणकवली : जिल्ह्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी शिवसेना-भाजपाला एकत्रित काम करावे लागेल. माझी समजूतदारपणाची भूमिका असून सावंतवाडीची विधानसभेची जागा दुसऱ्याला द्यावी असा उद्धव ठाकरेंनी निर्णय घेतल्यास आपली कोणतीही हरकत नाही, असे प्रतिपादन आमदार दीपक केसरकर यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवसेना प्रवेशाचा निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्या केसरकर यांचे कणकवली शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. जिल्हाप्रमुख वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, आबू पटेल, राजू शेटये, एकनाथ नारोजी, महिला आघाडीप्रमुख स्रेहा तेंडुलकर, श्रेया परब, तालुकाप्रमुख सचिन सावंत, बबन शिंदे, विलास साळसकर, अशोक रावराणे, राजन नाईक, रूपेश राऊळ, विवेक आरोलकर, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, अ‍ॅड.हर्षद गावडे, राजू राठोड, नगरसेवक सुशांत नाईक, शब्बीर मणियार, नंदू शिंदे, शैलेश तावडे, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.
आमदार केसरकर म्हणाले की, मी जेव्हा राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा भाजपाकडून मला निमंत्रण मिळाले होते. राज्याबाहेरील एका मोठ्या नेत्याने माझ्याबरोबर चर्चा केली होती. परंतु राणेप्रवृत्तीला विरोध करण्याची ताकद शिवसेनेतच आहे. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून ते दिसून आले. आपला महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे.
राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याशी माझी प्रदीर्घ चर्चा झाली होती. आज अजित पवार यांनी माझ्या सहकाऱ्यांना बोलावून घेतले आहे. राष्ट्रवादीतील माझे सहकारीही कुठल्याही स्थितीत दहशतवादी प्रवृत्तीला पाठिंंबा देणार नाहीत. उद्धव ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. तेवढेच निर्णय घेताना ते कठोर आहेत. स्थानिकांचे रक्षण करून विकास झाला पाहिजे. लोकांना विश्वासात घेतल्यास प्रकल्पांना विरोध होत नाही.
विकासासाठी येथे कारखाने नाहीत, बचतगटांच्या हाताला काम नाही, मी करेन तोच विकास असे म्हणणाऱ्यांना हद्दपार करायचे असेल तर विधानसभेच्या तीनही जागा जिंकाव्या लागतील, असे केसरकर म्हणाले. (प्रतिनिधी)
५ आॅगस्टला प्रवेश
राष्ट्रवादी कॉँग्रेसला रामराम ठोकला असला तरी आमदारकीचा राजीनामा २३ जुलै रोजी सादर करणार आहे. माझ्या मतदारसंघाचा दौरा करून राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेशामागील भूमिका मांडणार असून ५ आॅगस्ट रोजी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
राजकारण सोडणार होतो
लोकसभा निवडणुकीनंतर खरे तर मला राजकारणातून निवृत्त व्हायचे होते. मात्र, माझ्याबरोबर दहशतवादाविरोधातील लढाई लढलेल्या सहकाऱ्यांनी आणि जनतेने मला त्यापासून परावृत्त केले. आम्ही या लढाईत तुमच्यासोबत राहिलो आता अर्ध्यावर लढाई सोडू शकत नाही, असे सर्वांचे म्हणणे होते. त्यामुळे आपण राजकारण सोडले नाही.

Web Title: There is a need to work together for the destruction of bad habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.