गुहागर तालुक्यात कुंपणच शेत खातंय?
By Admin | Updated: July 19, 2015 23:36 IST2015-07-19T22:49:51+5:302015-07-19T23:36:09+5:30
मच्छिमारांचे निवेदन : धोपावेत पोलिस पाटलाचाच दारूधंदा

गुहागर तालुक्यात कुंपणच शेत खातंय?
गुहागर : तालुक्यातील पोलिसांकडून दारूधंद्यांवर कारवाई केल्याचा फार्स सुरु असताना पोलिसांना गाव पातळीवर सहाय्य करणारे अनेक पोलीसपाटीलच राजरोसपणे दारूधंदे करत असल्याचे समोर येत आहे. धोपावे येथील पोलीसपाटील शिरीष लाड हे दारुधंदा करत असल्याचे लेखी निवेदन येथील मच्छिमार समाजाने दिल्याने अशा पोलीसपाटलांवर कारवाई केली जाणार का? असा सवाल जनतेमधून केला जात आहे.
तालुक्यातील गावागावात पोलिसांचा सातत्याने प्रभावी संपर्क राहावा, सर्व चांगल्या - वाईट घडामोडींची पोलिसांना माहिती मिळावी, यासाठी पोलीसपाटील पदाची नियुक्ती असताना काही पोलीसपाटील राजरोसपणे दारुधंदा करताना दिसत आहेत. गावातील पोलीसपाटलांना पोलिसांप्रमाणेच काही अधिकार असल्याने याविरोधात आवाज उठविण्याची हिंमत ग्रामस्थांना होत नाही.
अनेक वेळा तक्रार करुनही सातत्याने पोलिसांच्या संपर्कात असणाऱ्या पोलीसपाटलांना आपले सहकारी मित्र म्हणून जाणीवपूर्वक पोलीस कारवाई करताना दुर्लक्ष करत आहेत. भातगाव पट्ट्यातही दोन पोलीसपाटलांचे दारुधंदे होते. यामधील ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर एकावर कारवाई करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी चिपळूण येथील पोलिसांच्या पथकाने भातगाव येथील पोलीसपाटलाच्या मुलांचा दारुधंदा उद्््ध्वस्त केला होता. त्यानंतर मात्र पुन्हा जैसे थे स्थिती आहे.
धोपावे येथील पोलीसपाटील शिरीष लाड यांच्या विरोधातही अनेकवेळा तक्रारी दारुधंदा सुरुच आहे. लाड यांच्या विरोधात मच्छीमार समाजाचे निवेदन गुहागर पोलीस ठाण्याकडे दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, धोपावे कोळीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावातील दारुधंदा बंद करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. गावात सर्वाधिक वस्ती कोळी समाजाची आहे. येथील चार वाड्या कोळी समाजाच्या असून, मच्छीमार बंदी कालावधीत समाजबांधवांना चांगल्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न येथील वाडीप्रमुख नागरिक करीत आहेत. असे असताना धोपावे येथील पोलीसपाटील शिरीष लाड हे मात्र खुलेआम दारु व्यवसाय करत आहेत. गावातील महिलांनी पोलीसपाटील लाड यांना दारु विकताना काही वर्षांपूर्वी पकडले होते.
मात्र, त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. ग्रामस्थांनी ७ जुलैला गावात बैठक घेऊन दारुबंदीचा ठराव केला आहे. तरीही धोपावे तेटलेचे पोलीसपाटील लाड हे गावात पिशवीतून दारुविक्री करत घरपोच सेवा देत आहेत, तरी या पोलीसपाटलांविरोधात कारवाई करुन गावातील दारु व्यवसाय बंद करावा, अशी मागणी आहे.
या निवेदनावर शिवशंकर पाटील, मोहन गुढेकर, पंढरी संसारे, चंद्रकांत जावकर, रवींद्र पाटील, विद्येश्वर भोरजी, अभिमन्यू गुढेकर, लवू नाटेकर, संजय भोरजी, उपसरपंच पावसकर आदींसह ग्रामस्थांच्या सह्या आहेत. या निवेदनानंतर पोलीस कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. गुहागर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील पोलीस पाटलांचे या प्रकाराला सहकार्य असल्याचेही काहिनी सांगितले. आता पोलीस भूमिकेकडे लक्ष आहे. (प्रतिनिधी)
गुहागर तालुक्यातील दारूधंदे बंद करण्याबाबतच्या कारवाईला वेग.
पोलीसपाटलाविरूध्द तक्रार केल्याने परिसरात खळबळ.
तीन वर्षांपूर्वीच्या पोलीस कारवाईचा उल्लेख.
गावात पोलीसपाटलांविरूध्द तक्रार दिल्याने पोलीस कारवाईबद्दल खात्री.
धोपावे पोलीस पाटलाविरूध्द तक्रार.
पोलीस यंत्रणेवर नजरा.