जिल्ह्यात चोऱ्या नाहीत, अफवाच

By Admin | Updated: October 2, 2015 23:19 IST2015-10-02T23:18:18+5:302015-10-02T23:19:46+5:30

तुषार पाटील : अनुचित प्रकार नाही; सोशल मीडियामुळे अफवा

There are no thieves in the district, rumor | जिल्ह्यात चोऱ्या नाहीत, अफवाच

जिल्ह्यात चोऱ्या नाहीत, अफवाच

रत्नागिरी : जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरी आणि लांजात चोरट्यांची टोळी आली असल्याच्या आणि त्यांनी विविध ठिकाणी लोकांवर हल्ला केल्याच्या घटना या केवळ अफवाच आहेत. सोशल मीडियामुळे या अफवा नको इतक्या पसरल्या आहेत, अशा शब्दांत रत्नागिरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी या घटनांचा इन्कार केला.
हाफ पँटवाले, घोंगडीवाले परराज्यातील चोरट्यांचे टोळके जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे टोळके दिवसभर जंगली भागात लपून राहते आणि रात्री गावात घुसतात. घरांवर दगडफेक करतात, दरवाजे ठोठावतात, लोकांना मारहाण करतात, अशा प्रकारची वृत्ते गेली तीन-चार दिवस रत्नागिरी आणि लांजातून चर्चिली जात आहेत. या साऱ्या प्रकारांबाबत पाटील यांनी इन्कार केला. रत्नागिरी किंवा लांजा येथे ज्या काही घटना घडल्याची चर्चा होत आहे किंवा मेसेज पसरत आहेत, त्या-त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी माहिती घेतली आहे. मात्र असा कोणताही प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेला नाही. या केवळ अफवाच आहेत आणि त्याला सोशल मीडियाच जबाबदार आहे, असे ते म्हणाले.
नागरिकांनी नेहमीच सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संशयास्पद वाटणाऱ्या लोकांबाबत पोलिसांना तत्काळ माहिती कळवायला हवी. पण सोशल मीडियावरून जे संदेश पाठवले जात आहेत, त्यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
गस्तीमध्ये वाढ
लोकांची सुरक्षितता लक्षात घेऊन पोलिसांनी रत्नागिरी आणि लांजा भागात गस्त वाढवली आहे. मात्र, अजूनही कोणतीही बाब संशयास्पद आढळलेली नाही. चोरट्यांच्या टोळीला पाहिलेला एकही माणूस सापडलेला नाही. या सर्व अफवाच आहेत, याचा पुनरूच्चार पाटील यांनी केला.
 

Web Title: There are no thieves in the district, rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.